#ENGvIND Test Series : भारतीय संघच मालिका जिंकेल – गावसकर

हेडिंग्ले – लॉर्डस कसोटी ज्या पद्धतीने भारतीय संघाने जिंकली. ती पाहता ही मालिकाही भारतीय संघच जिंकेल. आता इंग्लंडच्या संघाचे मनोधैर्य इतके खालावलेले आहे की त्यांना या मालिकेत पुनरागमन करणे प्रचंड कठीण आहे, असे मत भारताचे विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्‍त केले आहे.

भारताने लॉर्डस कसोटी जिंकून मनोवैज्ञानिक आघाडी घेतली आहे. लॉर्डसचे मैदान हे इंग्लंडसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा असतो. तिथेच त्यांना पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांच्या आत्मविश्‍वासालाच तडा गेला आहे. आता त्यांना उर्वरीत तीनही सामन्यांत भारतीय संघावर वर्चस्व राखणे शक्‍य होणार नाही, असा विश्‍वासही गावसकर यांनी व्यक्त केला.
क्रिकेट हा अनिश्‍चिततेचा खेळ आहे, आणि अनेक सामन्यांत परिस्थिती नाट्यमयरित्या बदलतानाही आपण अनेकदा पाहिली आहे. मात्र, या मालिकेत असे काही घडण्यासाठी एखाद्या चमत्काराचीच गरज आहे.

सध्या इंग्लंडच्या खेळाडूंची देहबोली पाहता असा कोणताही चमत्कार या मालिकेत घडेल असे वाटत नाही, असेही गावसकर म्हणाले.

इंग्लंडचा संघ केवळ कर्णधार ज्यो रूटवर अवलंबून आहे. जर तो मोठी खेळी खेळण्यात यशस्वी ठरला तरच त्यांच्यासाठी विजय खुणावतो. मात्र, जर तो अपयशी ठरल्यास संघात सामना फिरवू शकेल असा एकही फलंदाज नाही. लॉर्डस कसोटीतही हेच घडले. रूटने पहिल्या व दुसऱ्या कसोटीत अफलातून शतकी खेळी केल्या. मात्र, तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यातूनच त्यांच्या फलंदाजीच्या मर्यादा दिसून येतात, असेही गावसकर यांनी सांगितले.

स्टोक्‍सच्या अनुपस्थितीचा फटका

इंग्लंड संघाला या मालिकेत त्यांचा अष्टपैलु खेळाडू बेन स्टोक्‍स याच्या अनुपस्थितीचा मोठा फटका बसत आहे. स्टोक्‍सकडे फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात प्रतिस्पर्धी संघावर मात करण्याची क्षमता आहे. मात्र, त्याच्या विश्रांती घेण्याच्या निर्णयामुळे संघाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे, असेही गावसकर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.