#ENGvIND 4th Test : इंग्लंड समोर विजयासाठी 368 धावांचे आव्हान

ठाकूर व पंतने केली निर्णायक अर्धशतकी खेळी

लंडन – शार्दुल ठाकूर व ऋषभ पंतने अफलातून खेळी करत भारतीय संघाला सर्वबाद 466 असा धावांचा डोंगर उभारून दिला. आता इंग्लंडला विजयासाठी 368 धावा करण्याची गरज असून आता भारतीय संघाला हा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्याची संधीही निर्माण झाली आहे.

शनिवारच्या 3 बाद 270 धावांवरून पुढे खेळ सुरू केल्यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने निराशा केली. तो 44 धावांवर मोईन अलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. जडेजाही फारशी चमक दाखवू शकला नाही. त्यानंतर अजिंक्‍य रहाणे याही डावात अपयशी ठरला. त्यानंतर मात्र, ठाकूर व पंत या दोघांनीही अर्धशतके साकार केली. या जोडीने 7 व्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली व संघाला चारशे धावांचा पल्ला गाठून दिला.

ठाकूरने 72 चेंडूत 7 चौकार व 1 षटकार फटकावताना 60 धावांची खेळी केली. पंतने महत्त्वपूर्ण 50 धावांची खेळी केली. त्यात त्याने 106 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार फटकावले. हे दोघे पाठोपाठ बाद झाल्यावरही उमेश यादव व जसप्रीत बुमराह यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. यादवने 25 तर बुमराहने 24 धावांची खेळी करताना संघाला साडेचारशे धावांच्या पुढे मजल मारून दिली.

यादवने 23 चेंडूत 1 चौकार व 2 षटकार तर, बुनराहने 4 चौकार फटकावले. भारताचा डाव 148.2 षटकांत 466 धावांवर संपला. इंग्लंडकडून ख्रिस वोक्‍सने सर्वाधिक 3 गडी बाद केले. ओली रॉबिन्सन व मोईन अली यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. ज्यो रूट, क्रेग ओव्हरटन व जेम्स अँडरसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव – 191. इंग्लंड पहिला डाव – 290. भारत दुसरा डाव – 148.2 षटकांत सर्वबाद 466 धावा. (रोहित शर्मा 127, चेतेश्‍वर पुजारा 61, शार्दुल ठाकूर 60, ऋषभ पंत 50, लोकेश राहुल 36, विराट कोहली 44, उमेश यादव 25, जसप्रीत बुमराह 24, ख्रिस वोक्‍स 3-83, ओली रॉबिन्सन 2-105. मोईन अली 2-118, ज्यो रूट 1-16, क्रेग ओव्हरटन 1-58, जेम्स अँडरसन 1-79).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.