लंडन – जसप्रीत बुमराह, महंमद शमी व प्रसिद्ध कृष्णा यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीनंतर कर्णधार रोहित शर्मा व शिखर धवन यांच्या सहजसुंदर फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने यजमान इंग्लंडचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात मंगळवारी 10 गडी राखून पराभव केला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आता भारतीय संघाने 1-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे. अवघ्या 19 धावांत सहा फलंदाज बाद करणारा बुमराह सामन्याचा मानकरी ठरला.
लंडनमधील ओव्हल मैदान पुन्हा एकदा भारतासाठी लकी ठरले. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत इंग्लंडला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय बुमराह व शमीसह कृष्णानेही सार्थ ठरवताना त्यांचा डाव 26 व्या षटकांत 110 धावांवर संपवला. बुमराहने 19 धावांत 6 गडी बाद केले. शमीने 31 धावांच्या मोबदल्यात 3 फलंदाजांना तंबूत धाडले. कृष्णाने 26 धावांत 1 बळी घेतला.
इंग्लंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. संघाच्या अवघ्या 26 धावा झालेल्या असताना त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला होता. सलामीवीर जेसन रॉय, ज्यो रूट, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो व लियाम लिव्हिंगस्टोन स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कर्णधार जोस बटलरने थोडीफार चमक दाखवताना 32 चेंडूत 6 चौकारांसह 30 धावांची खेळी केली. त्याला साथ देताना डेव्हीड विलीने 21, ब्रेंडन कार्सने 15 तर मोईन अलीने 14 धावांची खेळी केल्याने त्यांना धावफलकावर शतक झळकावता आले. कार्स व विली यांनी 9 व्या गड्यासाठी केलेली 35 धावांची भागीदारी त्यांच्यासाठी महत्वाची ठरली.
जखमी मुलीची रोहितने केली चौकशी…
रोहित शर्माने या डावात एक षटकार फटकावला होता व त्यामुळे प्रेक्षकांमध्ये बसलेली एक लहान मुलगी हा चेंडू लागून जखमी झाली. इंग्लंडच्या डेव्हीड विलीने रोहितला याची कल्पना दिली. सामना संपल्यावर रोहितने या मुलीची चौकशी केली.
विजयासाठी 111 धावांचा पाठलाग करताना कर्णधार व सलामीवीर रोहित शर्माने शिखर धवनच्या साथित संयमी सुरुवात केली व संघाला भक्कम सलामी दिली. मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या धवनने संथ फलंदाजी करत रोहितला साथ दिली. रोहितने आक्रमक फटकेबाजी केली. या जोडीने आधी अर्धशतकी तर त्यावर कळस चढवताना शतकी भागीदारी करत एकही गडी न गमावता भारताला मोठा विजय मिळवून दिला.
48 वर्षानंतर भारताने रचला इतिहास…
भारताने तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेमध्ये पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा10 गडी राखून दारुण पराभव केला आहे. गेल्या 48 वर्षांत पहिल्यांदाच भारतीय संघाने इंग्लंडविरोधात ही कामगिरी केली आहे. भारताने इंग्लंडविरोधात पहिल्यांदा 1974 साली एकदिवसीय सामना खेळला होता.
कर्णधार रोहित शर्माने रोहित व धवन जोडीने एकदिवसीय सामन्यांतील आपली 18 वी शतकी भागीदारीही नोंदवली. रोहितने नाबाद 76 धावांची खेळी करताना 58 चेंडूंचा सामना करत 6 चौकार व तब्बल 5 षटकारांची आतषबाजी केली. धवनने 54 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या. या जोडीने 19 व्या षटकांतच बिनबाद 114 धावा करत संघाचा विजय साकार केला.
संक्षिप्त धावफलक –
इंग्लंड – 25. 2 षटकांत सर्वबाद 110 धावा. (जोस बटलर 30, डेव्हीड विली 21, ब्रेंडन कार्स 15, मोईन अली 14, जसप्रीत बुमराह 6-19, महंमद शमी 3-31, प्रसिद्ध कृष्णा 1-26).
भारत – 18.4 षटकांत बिनबाद 114 धावा. (रोहित शर्मा नाबाद 76, शिखर धवन नाबाद 31).