दखल: इंग्रजी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी

तुषारिका लिमये

प्रत्येक ठिकाणची प्रादेशिक भाषा हीच प्राथमिक शिक्षणासाठी उत्तम असते, हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे. परंतु आज जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी इंग्रजीचे उत्तम ज्ञान आवश्‍यक आहे याची जगात सर्वत्र जाणीव झाली आहे. भारतही त्यास अपवाद नाही.

गेल्या दशकात इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संख्येत झालेली वाढ लक्षणीय आहे. अगदी छोट्याशा खेड्यात गेले तरी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आढळतात. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वाढलेला आहे. यात बहुतांशी शाळा खासगी आहेत, पण मोठ्या शहरांमध्ये महापालिका/जिल्हा परिषदेने काही इंग्रजी शाळा सुरू केल्या आहेत. शिक्षण कुठल्याही माध्यमातून झाले तरी ज्याला यशाचा उच्चांक गाठायचा आहे, त्याला भाषेची कोणतीही उडचण येत नाही. हे जरी खरं असले तरी पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्रजीचीच निवड करावी लागते, हे यशस्वी लोकही कबूल करतील. याचे कारण इंग्रजी ही “लायब्ररी लॅंग्वेज’ आहे. ज्यांना उच्च शिक्षण घेऊन संशोधन करायचे आहे आणि आपल्या संशोधनाला जगाची मान्यता मिळवायची आहे, त्यांनी आपल्याच मातृभाषेचा आग्रह धरला तर ते आपल्याच अभ्यासाभोवती सीमा आखत असल्यासारखे होईल.

शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात यश मिळवणे ही एक बाब आहे. एखाद्या विषयाचे ज्ञान असते, पण ते ज्ञान दुसऱ्यांपर्यंत ते पोहोचवू शकत नाहीत. थोडक्‍यात शिकवणे, अध्यापन करणे ही एक कला आहे, काही प्रमाणात ते एक कौशल्य आहे. एकच कौशल्य नव्हे तर अनेक उपकौशल्ये त्यात सामावलेली आहेत. त्यात संभाषणकला, थोडं नाट्य, बालमानसशास्त्र, विविध अध्यापन पद्धती, व्यक्‍तिमत्त्व अशा सर्व गोष्टी येतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विषयज्ञान हे विषयातील महत्त्वाच्या संकल्पना या स्पष्ट करण्यासाठी भाषेवर प्रभुत्व आहे. याशिवाय प्रत्येक विषयाचे एक वेगळे “रजिस्टर’ असते. म्हणजे तांत्रिक शब्दकोश असतो. भूगोलात काही ठराविक शब्द असतात, गणितात वेगळे असतात, तर विज्ञानात अजून वेगळे. मग माध्यम मराठी असो अथवा इंग्रजी. हा शब्दकोश अर्थातच प्रत्येक भाषेत वेगळा असतो.

भाषेच्या बाबतीत एक इनपुट थेअरी आहे. म्हणजे भाषेचा जो इनपुट भोवतालून मिळतो, तसाच आउटपुट असतो. म्हणूनच लहानपणापासून आपल्याला आपल्या मातृभाषेचा “इनपुट’ मिळतो आणि आपण तीच भाषा बोलायला शिकतो. त्यातही कोकणातल्या बालकाची आणि विदर्भातल्या बालकाची भाषा सारखी नसते. कारण त्यांचा इनपुट थोडा वेगळा असतो. झोपडपट्टीतील मुले वेगळे बोलतात. कारण त्यांचा इनपुट तसा असतो. जेवढा जास्त इनपुट तेवढी भाषेची समृद्धी. इंग्रजी माध्यमात जाणाऱ्या बहुतांशी मुलांना इंग्रजी भाषेचा मर्यादित इनपुट मिळतो.

प्राथमिक शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठी अध्यापन-अध्ययन अवघड असते. कारण आधी एक नवीन परकीय भाषा शिकायची आणि त्याच भाषेच्या माध्यमातून वेगवेगळे विषय शिकायचे. हे जर योग्य पद्धतीने झाले नाही, तर ते शिक्षण फोल आहे. ज्यावेळी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पीक अचानक सर्वत्र पसरले, तेव्हा असे झाले की त्या शाळांपासून शिकवायला पुरेसे तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध नव्हते. कोणत्याही शिक्षकांच्या नेमणूक केल्या गेल्या. परिणामी एक पिढी अशी निर्माण झाली की त्या मुलांना धड इंग्रजी ना येते ना आपली मातृभाषा. याच पिढीतल्या काही जणांनी पुढे शिक्षकी पेशा निवडला. सध्या बिचाऱ्या इंग्रजीचे काय हाल चालले आहेत ते पाहून रडू येते आणि इंग्रजीच्या प्रभावामुळे मातृभाषेवर येत असलेले दडपण सहन होत नाही. तेव्हा शिक्षकांची नियुक्‍ती करताना या सर्व गोष्टींचा विचार व्हावा.

विविध स्तरांवर शिकवण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते. बालवाडीचे प्रशिक्षण, प्राथमिकसाठी डीएलडी, माध्यमिकसाठी बीएड्‌ आणि पुढे एमएड्‌ असे स्तर का असतात? कारण प्रत्येक स्तरासाठी वेगळी अध्यापन कौशल्ये लागतात. इतक्‍या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो.

मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्यांची नियुक्‍ती इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये करावी का नाही? जरूर करावी. कारण शिक्षण पद्धतीचे त्यांना ज्ञान असते. शिक्षक होण्यासाठीचे सर्व प्रशिक्षण त्यांना दिलेले असते. प्रश्‍न असतो तो फक्‍त भाषेचा. जे इंग्रजीतून पदवीप्राप्त केलेले शिक्षक असतात त्यांनी मराठीतून प्राथमिक शिक्षण घेतलेले असते, त्यांनी कधीतरी इंग्रजीसाठी प्रयत्न केलेलेच असतात. जे उच्च शिषण घेतात, त्यांनाही इंग्रजीसाठी प्रयत्न करावेच लागतात. संपूर्ण शिक्षण मराठीतून घेतले तरी इंग्रजी एमए किंवा पीएचडी करता येते. मग प्राथमिक शिक्षण मराठीतून घेतले तरी प्रयत्न करून प्राथमिक/माध्यमिकमध्ये शिकवण्यासाठी प्रयत्न का करता येऊ नये?

महत्त्वाची गोष्ट ही आहे की मुलांना त्यांच्या पातळीप्रमाणे समजेल या पद्धतीने विविध संकल्पना समजावता आल्या पाहिजेत. त्यासाठी योग्य शब्द अचूक वापरता आले पाहिजेत. ज्या हेतूने पालक मुलांना इंग्रजी माध्यमात पाठवतात तो हेतू साध्य झाला पाहिजे. नियुक्‍ती करताना शिक्षणाचे माध्यम न पाहता शिक्षक तयारी करून योग्य पद्धतीने इंग्रजीतून शिकवू शकतो? त्याचे इंग्रजी भाषेवर पुरेसे प्रभुत्व आहे का? त्याला इंग्रजीतून संकल्पना समजावून सांगता येतात का? प्रत्येक विषयाची टर्मिनॉलॉजी त्याला माहीत आहे का? अशी किमान अपेक्षा करणे यात चुकीचे आहे? आणि शिक्षक असे करण्यास सक्षम असेल तर त्याची नियुक्‍ती करण्यास काय हरकत आहे?

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.