न्यायालयात याचिका दाखल करण्याचा संस्थाचालकांचा इशारा
बारामती (प्रतिनिधी) – जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत प्रवेशाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे; मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मागील दोन वर्षांपासून प्रतिपूर्ती शुल्काचा परतावा मिळाला नसल्याने शाळा अडचणी आल्या आहेत. त्यामुळे मागील शुल्काचा परतावा न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा संस्थाचालकांच्या वतीने घेण्यात आला आहे.
बारामती येथे जिल्ह्यातील संस्थाचालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी संस्थाचालकांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे ( मेस्टा) जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष सतीश सांगळे यांनी दिली दुर्बल व वंचित घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत 25 टक्के जागांवर मोफत प्रवेशाची योजना आहे. यात शाळांना प्रतिपूर्ती शुल्कबाबत एक वर्षाच्या आत परतावा देणे बंधनकारक आहे; मात्र शासनाकडून 2017 /18 चे पन्नास टक्के रक्कम बाकी आहे 18-19 ची संपूर्ण रक्कम बाकी आहे.
यामुळे प्रलंबित कार्यवाही न झाल्यास संस्थापक-अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील संस्थाचालकांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय माळशिकारे, सरचिटणीस वैभव जगताप, जिल्हा कोषाध्यक्ष ऍड रवींद्र पोमणे पुरंदर तालुकाध्यक्ष बाळासाहेब झगडे, बारामती तालुकाध्यक्ष राहुल बनकर, उपाध्यक्ष नितीन जाधव, दौड तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कदम, भोर तालुकाध्यक्ष विकास साळवी, संघटक संग्राम मोकाशी व जिल्ह्यातील संस्थाचालक उपस्थित होते.