लंडन – इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत वुल्व्ह संघाने शेफिल्ड युनायटेडचा 2-0 असा पराभव केला व स्पर्धेत आगेकूच केली. या विजयासह त्यांनी 3 गुणांसह गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले आहे. या तालिकेत अर्सेनलनेही 3 गुणांसहच पहिले स्थान प्राप्त केले असले तरीही त्यांचे रेटिंग गुण जास्त असल्याने त्यांनी अग्रस्थान कायम राखले आहे.
वुल्व्ह व शेफिल्ड युनायटेड सामना सुरू झाल्यावर दोन्ही संघांनी एकमेकांचा बचाव भेदण्याचा सातत्याने प्रयत्न केला. तिसऱ्या मिनिटाला वुल्व्हच्या राऊल जेमिनेजने गोल केला व संघाला आघाडी प्राप्त करून दिली. यानंतर शेफिल्ड युनायटेडनेही बरोबरी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यांना वुल्व्हचा बचाव भेदण्यात यश आले नाही. वुल्व्हच्याच रोमेन सेसने 6 व्या मिनिटाला गोल केला व संघाची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. यानंतर संपूर्ण सामना संपेपर्यंत शेफिल्ड युनायटेड संघाला एकही गोल करता आला नाही व वुल्व्हने हा सामना सहज जिंकला.