मात्र, वेळ अपुराच पडल्याचे सांगत टेन्शन मिटल्याची व्यक्त केली भावना
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. पुण्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे औक्षण करून उत्साहात स्वागत करण्यात आले. पहिला पेपर इंग्रजीचा होता. हा पेपर सोपा होता; पण वेळ अपुराच पडला असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. इंग्रजीचा पेपर चांगला गेल्यामुळे टेन्शन मिटल्याची भावनाही विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
राज्यात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या 9 विभागीय मंडळांमार्फत वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्यात येऊ लागल्या आहेत.
विद्यार्थी व पालकांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 9 वाजल्यापासून गर्दी करण्यास सुरुवात केली होती. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी व परत घरी सोडण्याला बहुसंख्य पालकांनी प्राधान्य दिले होते. आपल्या मुलांना बैठक क्रमांक कोणत्या ब्लॉकमध्ये आहे, हे शोधून देण्यापासून ते मुलांना ब्लॉकमध्ये बसविण्यासाठी पालक गुंतले होते. भावे हायस्कूलसह इतर शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, शाळांचे पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले. स्वागतामुळे विद्यार्थी, पालकही आनंदाने भारावून गेल्याचे चित्र पहायला मिळाले. दरम्यान, पेपर सुरू होण्यापूर्वी व पेपर सुटल्यानंतर काही महाविद्यालयांच्या परिसरात वाहतूक कोंडीही झाली होती.
82 कॉपीबहाद्दर आढळले
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेत कॉपी करताना 82 विद्यार्थी सापडले. यात सर्वाधिक लातूर विभागात 34 कॉपी बहाद्दर सापडले आहे. बारावी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी 273 भरारी पथके नियुक्त केली आहेत. या पथकांचा परीक्षा केंद्रावर सतत वॉच ठेवण्यात येणार आहे. पुणे विभागात 6, नागपूर 4, औरंगाबाद 7, कोल्हापूर 4, अमरावती 9, नाशिकमध्ये 18 याप्रमाणे विभागांत कॉपीचे गैरप्रकार उघडकीस आले. मुंबई व कोकण या दोन विभागांत एकही कॉपीचे प्रकरण आढळून आलेले नाही, अशी माहिती राज्य मंडळाकडून मिळाली.
अपेक्षित गुण नक्कीच मिळतील…
इंग्रजीच्या पेपरचे टेन्शन आले होते. मात्र, प्रश्नपत्रिका हातात पडताच ती सोपी असल्याचे कळले. यामुळे टेन्शन दूर झाले. वेळेचे व्यवस्थापन करून पेपर लिहिण्याचा वेग वाढवावा लागल्याने पेपर पूर्ण झाला. या पेपरमध्ये अपेक्षित गुण नक्तीच मिळतील, अशी मते नू.म.वि. प्रशाला व कनिष्ष्ठ महाविद्यालयातील तुषार नाझिरकर, अभिषेक रांजणे, आर्या गायकवाड या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. काही प्रश्नांना गुण कमी असले तरी उत्तरे मात्र जास्त लिहावी लागली. हे करताना कसरत करावी लागली, असेही विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
इंग्रजीचा पेपर सोपा होता. विद्यार्थ्यांनी तो तीन तासांत पूर्ण केला. प्रश्नपत्रिकेत काहीच चुका नाहीत. शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होत आहे. यामुळे या विषयाचा निकाल चांगला लागणार आहे.
– प्रा. संतोष फाजगे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना