शिक्षक भरतीत 20 टक्के जागा आरक्षणाची मागणी : उच्च न्यायालयात याचिका
पुणे – पवित्र पोर्टलद्वारे होत असलेल्या शिक्षक भरतीसाठी इंग्रजी माध्यमातून डी.एड. झालेल्या उमेदवारांसाठी 20 टक्के जागा आरक्षित ठेवण्याबाबतची मागणी या उमेदवारांकडून करण्यात येऊ लागली आहे. याबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर येत्या 29 एप्रिल रोजी अंतिम फैसला होणार आहे.
आठ वर्षांनंतर आता शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु झाली असून यात अनेक अडथळे येऊ लागले आहेत. यामुळे भरती प्रक्रिया पुढे सरकण्याचा वेगही मंदावला आहे. यंदा 12 हजार जागांसाठी भरती होणार असून यासाठी पोर्टलवर स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शैक्षणिक संस्थांनी जाहिराती प्रसिद्घ केल्या आहेत. उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्याची प्रतिक्षा लागलेली आहे. मात्र यात आता न्यायालयाचा अडसर आला आहे.
राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता बारावी व डी.एड. इंग्रजी माध्यमातून झालेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी 20 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय 20 जून 2008 रोजी घेण्यात आला होता. यामुळे बहुसंख्य उमेदवारांच्या नोकरीसाठी आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, त्या फार काळ टिकू शकल्या नाहीत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतूदीनुसार प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावी ते आठवीसाठी विषयनिहाय शिक्षक उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. इयत्ता पहिली ते पाचवीदरम्यान विज्ञान व गणितासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षक उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता नाही. बरेच शिक्षक इंग्रजी विषय शिकविण्यास तयार आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची ज्या जिल्हा परिषदेस आवश्यकता असेल, त्यांना भरती प्रक्रियेतून इंग्रजी माध्यमातील शिक्षक उपलब्ध घेऊ शकतात. यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत इंग्रजी माध्यमांच्या अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांकरीता सरसकट 20 टक्के आरक्षण ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे आदेशात नमूद करत शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पूर्वीचे आरक्षण 27 जून 2018 रोजी रद्द केले आहे.
शासन निर्णयाच्या विरुद्ध उमेदवारांनी एकत्र येऊन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. यावर दि.12 मार्च रोजी न्यायालयाने “भरती प्रक्रियेदरम्यान या उमेदवारांच्या हक्कांना बाधा येणार नाही याची खबरदारी शासनाने घ्यावी,’ असे अंतरिम आदेश जारी केले आहेत. उमेदवारांच्या वतीने ऍड.राजेंद्र टेमकर व नितीन पाटील हे न्यायालयात बाजू मांडत आहे.