ऑकलंड – नतालिया सीव्हरच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान न्यूझीलंडचा 1 गडी राखून पराभव केला व उपांत्य फेरी गाठण्याचा दावा कायम केला आहे.
इंग्लंडची कर्णधार हेदर नाईटने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. मॅडी ग्रीनचे अर्धशतक व सोफी डीवायइनच्या उपयुक्त खेळाच्या जोरावर न्यूझीलंडने सर्वबाद 203 धावांपर्यंत मदल मारली. या दोघींना सुरेख साथ देत अमेलिया केर, अमी सॅदरवेट व सुझी बेट्स यांनी उपयुक्त खेळी केली. इंग्लंडकडून केट क्रॉस व सोफी एक्केलस्टोन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. प्रमुख फलंदाज अपयशी ठरत असताना नतालिया सिव्हरने अर्धशतकी खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. तिला सुरेख साथ देताना हेदर नाईट, सोफी डुंक्ले व टॅमी ब्लुमोंट यांनी विजयाच्या मार्गावर वाटचाल सुरू केली. मात्र, हा सामना अखेरच्या षटकातही चांगलाच रंगला. नतालिया बाद झाल्यावरही अना श्रुबसोलने संघाचा विजय साकार केला व हा सामना 1 गडी राखून जिंकला. न्यूझीलंडकडून फ्रॅंकी मकायने 4 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड – 48.5 षटकांत सर्वबाद 203 धावा. (मॅडी ग्रीन 52, सोफी डीवाइन 41, अमेलिया केर 24, अमी सॅदरवेट 24, सुझी बेट्स 22, केट क्रॉस 3-35, सोफी एक्केलस्टोन 3-41). इंग्लंड – 47.2 षटकांत 9 बाद 204 धावा. (नतालिया सीव्हर 61, हेदर नाईट 42, सोफी डुंक्ले 33, टॅमी बुमोंट 25, फ्रॅंकी मकायने 4-34, जेस केर 2-36).