इंग्लंडच्या टॉम बॅंटनच्या 40 चेंडूत 121 धावा

नवी दिल्ली: इंडियन प्रिमियर लीगच्या वर्ष 2020 साठी खेळाडूंचा लिलाव दृष्टीपथात असताना इंग्लंडमध्ये एका आक्रमक फलंदाजाने 40 चेंडूत 121 धावा करुन प्रायोजकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

टॉम बॅंटन याने क्वीन्सलॅंड प्रिमिअर क्रिकेट टी-20 लीग स्पर्धेत 8 चौकार आणि 13 षटकारांचा पाऊस पाडला. टॉमने फक्त 40 चेंडूत 121 धावा केल्या. विशेष म्हणजे ही खेळी करण्याच्या एक दिवस आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी टॉमचा इंग्लंडच्या संघात समावेश केला गेला आहे.

टॉमची ही खेळी म्हणजे येत्या 17 डिसेंबरपासून होणाऱ्या बिग बॅश लीगची पूर्वतयारी असल्याचे मानले जात आहे. बिग बॅश लीग स्पर्धेत टॉम ब्रिस्बेन हीट संघाकडून खेळणार आहे. क्वीन्सलॅंड प्रिमिअर टी-20 लीग स्पर्धेत टॉमने तोम्बुल संघाविरुद्ध ही आक्रमक खेळी केली. टॉमच्या या कामगिरीमुळे व्हीनम संघाने 20 षटकात 5 बाद 214 धावा केल्या.

टॉमने 295 च्या विक्रमी स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. मात्र, टॉमच्या या खेळीचा संघाला फायदा झाला नाही. तोम्बुल संघाने विजयाचे लक्ष्य 9 विकेटच्या बदल्यात आणि एक चेंडू राखून पार केले.

Leave A Reply

Your email address will not be published.