#ENGvPAK 2nd T20I : इंग्लंडचा पाकवर सहज विजय

मॅंचेस्टर – यजमान इंग्लंडने दुसरा टी-20 सामना 5 गडी राखून सहज जिंकला व पाकिस्तानवर 1-0 अशी आघाडी घेतली. पहिला सामना पावसाने वाया गेला असून आता मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी पाकिस्तानला तिसरा सामना जिंकावा लागणार आहे.

बाबर आझम आणि महंमद हाफीज यांच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने 20 षटकात 196 धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि डेव्हिड मलान यांच्या धडाकेबाज खेळींच्या जोरावर इंग्लंडने अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात
विजय मिळवला.

आझमने 44 चेंडूत 56 धावांची खेळी केली. त्यात 7 चौकार फटकावले. याच बरोबर आझमने टी-20 क्रिकेटमध्ये 1500 धावांचा टप्पा गाठला. 39 व्या डावात त्याने हा पल्ला गाठला. विराट कोहली आणि अरॉन फिंच या दोघांनीही 39 व्या डावातच 1500 धावांचा टप्पा गाठला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 195 धावा केल्या. कर्णधार बाबरने 56 तर, हाफीजने 69 धावा केल्या. हाफीजने 5 चौकार आणि 4 षटकार फटकावले. फखर झमानने 36 धावांची उपयुक्त खेळी केली. इंग्लंडविरूद्धची ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली.

196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने अर्धशतकी सलामी दिली. टॉम बॅन्टन आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात लवकर बाद झाला. मात्र, जॉनी बेअरस्टोने 24 चेंडूत 44 धावा फटकावल्या. तो बाद झाल्यावर मात्र, मॉर्गनने मलानच्या साथित संघाला विजयाच्या समिप आणले. मॉर्गन 66 धावांवर बाद झाल्यानंतर मलानने 54 धावा करत संघाचा विजय साकार केला. 33 चेंडूत 66 धावांची खेळी करणारा मॉर्गन सामनावीर ठरला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.