लंडन – सध्याची जागतिक अनिश्चितता आणि करोनामुळे निर्माण झालेली भीती पाहता तिसऱ्या जागतिक महायुद्धाची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा इंग्लंडचे लष्करप्रमुख निक कार्टर यांनी दिला आहे.
लंडनच्या लष्करातील शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देण्याच्या कार्यक्रमात कार्टर बोलत होते. वेगवेगळ्या विभागात तणावाचे वातावरण आहे. त्यात एखादा अंदाज चुकला तरी युद्धाचा वणवा पेटू शकतो. आपण अत्यंत अनिश्चित अशा वातावरणात आणि चिंताग्रस्त जगात जगत आहोत. त्याचवेळी जागतिक स्पर्धेचे दडपण आपल्यावर आहे. सध्याच्या क्षणाला विभागीय संघर्ष वाढलेले आहेत. त्यात एखादा आडाखा चुकला तर हा ताण तीव्र स्वरूप धारण करू शकतो, असे कार्टर म्हणाले.
तुम्हाला आणखी एका महायुद्धाची भीती वाटते का? असे थेट विचारता ते म्हणाले, मी म्हणतो तो धोका आहे आणि आपण या धोक्यांसाठी सतर्क रहायला हवे. आपण मागील युद्धात प्राण गमावलेल्यांची आठवण ठेवायला हवी. त्यावेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घ्यायला हवी.
इतिहास आपली पुनरावृत्ती स्वत: करत नसतो. पण त्याची एक गती असते. मागील दोन्ही महायुद्धात तणाव वाढला होता. त्यातून अडाखे चुकल्यामुळे त्याचे पर्यवसान युद्ध पेटण्यात झाले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपण आशावादी रहायला हवे, असे ते म्हणाले.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा