पुणे – जॉनी बेअरस्टोचे आक्रमक शतक व अष्टपैलू बेन स्टोक्सची 99 धावांची वादळी खेळी यांच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 6 गडी राखून पराभव केला व तिन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. आता या दोन संघात येत्या रविवारी होत असलेला तिसरा सामना मालिका विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. हा सामना गाजला तो इंग्लंडने त्यांच्या डावात तब्बल 20 षटकार फटकावले.
भारताने विजयासाठी दिलेले 337 धावांचे आव्हान इंग्लंडने 44 व्या षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. इंग्लंडच्या डावाची सुरूवात जेसन रॉय व बेअरस्टो यांनी थाटात केली. या जोडीने 17 व्या षटकांतच 110 धावांची भक्कम सलामी दिली. रॉय अर्धशथकी खेळी केल्यानंतर स्थिरावल्यावर रोहित शर्माच्या अप्रतिम चेंडूफेकीवर धावबाद झाला. त्यानंतर आलेल्या बेन स्टोक्सने भारतीय गोलंदाजीचा पालापाचोळा केला. या दोघांनी भारतीय गोलंदाजांना केवळ चौकार व षटकारांचीच भाषा शिकवली. त्यातही भारताच्या प्रमुख गोलंदाजांनी दिशाहीन गोलंदाजी केल्याने भारताला भक्कम धावसंख्या उभारुनही पराभव पत्करावा लागला.
बेअरस्टोने शतकी खेळीत 124 धावा करताना 112 चेंडूंत 11 चौकार व 7 षटकारांची आतषबाजी केली. दुसरीकडे स्टोक्सच्या आक्रमणाला भारतीय गोलंदाजांकडे उत्तरच नव्हते. त्याने अर्धशतकानंतर तर धावांचा वेग आणकी वाढवला. मात्र, त्याचे शतक पूर्ण होऊ शकले नाही. त्याने 52 चेंडूत 4 चौकार व तब्बल 10 षटकार फटकावत 99 धावा केल्या. मात्र, हे दोघे बाद झाल्यावर त्यांचा डाव अडचणीत आला होता. भुवनेश्वर कुमारने स्टोक्सला बाद केल्यावर नवोदित वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने एकाच षटकात बेअरस्टो व कर्णधार जोस बटलर यांना बाद करत सामन्यात रंगत आणली होती. मात्र, त्यानंतर इंग्लंडकडून पदार्पण करत असलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनने जबाबदारीने खेळ करताना डेव्हिड मलानला साथीला घेत डाव सावरला. या जोडीने पाचव्या गड्यासाठी अखंडीत अर्धशतकी भागीदारी करत संघाचा विजय साकार केला.
तत्पू्र्वी, लोकेश राहुलचे दमदार शतक व कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 6 गडी गमावून 336 धावांचा डोंगर उभा केला. राहुलच्या पाचव्या एकदिवसीय शतकानंतर पंत व पंड्या यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीची वाताहत केली. कोहलीनेही 66 धावांची उपयुक्त खेळी केली.
या सामन्यात नियमित कर्णधार इयान मॉर्गन दुखापतीमुळे खेळू शकला नसल्याने जोस बटलर संघाचे नेतृत्व करत होता. त्याने नाणेफेक जिंकूनही भारताला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय पहिल्यांदा योग्य वाटत होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्या सामन्यातील शतकवीर शिखर धवन व हिटमॅन रोहित शर्मा यांना लवकर बाद करण्यात यश मिळवले. मात्र, त्यानंतर कोहलीने राहुलच्या साथीत संघाचा डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 121 धावांची बहुमोल भागीदारी केली व संघाला शतकी धावसंख्या गाठून दिली.
कोहली चांगला खेळत असताना पुन्हा एकदा आदील रशिदच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक बटलरकडे झेल देत बाद झाला. त्याने 79 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने 66 धावा केल्या. तो बाद झाल्यावर आलेल्या पंतने राहुलला सुरेख साथ देत वादळी फलंदाजी केली. त्याला पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती, त्याची कसर त्याने या सामन्यात भरून काढली. त्याने फटकेबाजी करताना राहुलवरील दडपण दूर केले. दरम्यान राहुलनेही अर्धशतक पूर्ण केले व शतकाकडे कूच केले. त्याने एकदिवसीय सामन्यांतील पाचव्या शतकाला गवसणी घालताना 114 चेंडूत 7 चौकार व 2 षटकार फटकावताना 108 धावांची खेळी केली. मात्र, त्यानंतर आक्रमक फटका खेळताना तो बाद झाला. त्याने पंतसह चौथ्या गड्यासाठी 113 धावांची भागादारी केली.
राहुल बाद झाल्यानंतर पंतनेही धडाक्यात अर्धशतक साकार केले. त्याने हार्दिक पंड्यासह त्यानंतर तो शतक फटकावेल असे वाटत असतानाच पंचांच्या सॉफ्ट सिग्नलचा बळी ठरला. त्याने 40 चेंडूत 3 चौकार व 7 षटकारांची आतषबाजी करत 77 धावा केल्या. पंत बाद झाल्यावर हार्दिकला साथ देण्यासाठी त्याचा भाऊ कृणाल खेळपट्टीवर आला. त्यावेळी हार्दिकने गिअर बदलला व वेगाने धावा केल्या. तो 16 चेंडूत 1 चौकार व 4 षटकारांसह 35 धावांची खेळी केली व संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. कृणाल 12 धावांवर तर, शार्दुल ठाकूर 0 धावांवर नाबाद राहिले.
इंग्लंडकडून रॅकी टॉपली व टॉम कुरेन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सॅम कुरेन व आदील रशिद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – भारत – 5- षटकांत 6 बाद 336 धावा. (लोकेश राहूल 108, ऋषभ पंत 77, विराट कोहली 66, हार्दिक पंड्या 35, कृणाल पंड्या नाबाद 12, शार्दुल ठाकूर नाबाद 0, रॅकी टॉपली 2-50, टॉम कुरेन 2-83, सॅम कुरेन 1-47, आदील रशिद 1-65). विरूध्द इंग्लंड – 43.3 षटकांत 4 बाद 337 धावा. (जॉनी बेअरस्टो 124, बेन स्टोक्स 99, जेसनॉय 55, लियाम लिव्हिंगस्टोन नाबाद 27, डेव्हिड मलान नाबाद 16, प्रसिध कृष्णा 2-58, भुवनेश्वर कुमार 1-63).