#ICCWorldCup2019 : शकीबचे शतक व्यर्थ, इंग्लंडचा शानदार विजय

जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांची शतकी भागीदारी

कार्डिफ – शकीब अल हसन याने झुंजार शतक करुनही बांगलादेश संघाला इंग्लंडकडून 106 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विजयासाठी 387 धावांचा पाठलाग करताना त्यांनी 48.5 षटकांमध्ये सर्वबाद 280 धावा केल्या. जेसन रॉय याने केलेल्या धावा हे इंग्लंडच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.

बांगलादेशने तमीम इक्‍बाल (19) व सौम्य सरकार (2) ही सलामीची जोडी 63 धावांमध्ये गमावली. तथापि शकीब याने मुशफीकर रहीम याच्या साथीत 106 धावांची भागीदारी केली. शकीब याने 119 चेंडूमध्ये 121 धावा केल्या. त्यामध्ये त्याने बारा चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. मुशफीकर रहीम याने दमदार खेळ करीत 44 धावा केल्या.

मोहम्मद्दुला (28) व मोसादिक हसन (26) यांनी शेवटच्या फळीत केलेले प्रयत्नही पराभव टाळण्यासाठी अपुरे ठरले.
दरम्यान, जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी केलेल्या शतकी सलामीच्या जोरावर इंग्लंडने शनिवारी झालेल्या सामन्यात विश्‍वचषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळी केली. रॉयने 153 धावांची खेळी केली.

दरम्यान, इंग्लंडची विश्‍वचषक स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी त्यांनी 2011 मध्ये भारताविरुद्ध 338 धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यात हा विक्रम मोडत इंग्लंडने 6 बाद 386 धावा केल्या. तसेच एकदिवसीय सामन्यात सलग 7 सामन्यांत 300हून अधिक धावा करण्याचा विक्रमही प्रस्थापित केला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. जेसन रॉय आणि बेअरस्टो या जोडीने बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना 15 षटकांत शतकी भागीदारी केली. सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी 20 षटकांतच 128 धावांची भागीदारी केली.

बेअरस्टोने 50 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यानंतर जेसन रॉयने जो रुटच्या मदतीने आपले विश्‍वचषक स्पर्धेतील पहिले शतक झळकाविले. यावेळी शतकी धाव घेताना रॉयने पंचांना चुकीने धडक मारली. ज्यामुळे पंच जोएल विल्सन थेट जमिनीवर पडले.

संक्षिप्त धावफलक :

इंग्लंड 50 षटकात 6 बाद 386 (जेसन रॉय 153, जॉनी बेअरस्टो 51, जोस बटलर 64, मोहम्मद सैफुद्दिन 2-78, मेहंदी हसन 2-67). बांगलादेश 48.5 षटकात सर्वबाद 280 (शकीब अल हसन 121, मुशफीकर रहीम 44, बेन स्टोक्‍स 3-23, जोफ्रा आर्चर 3-29, मार्क वुड 2-52)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.