24 तासांत खेळले गेले दोन्ही संघांचे सामने
मॅंचेस्टर – करोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या इंग्लंड संघाने आयसीसीच्या नव्या निर्देशानुसार देशाचे दोन संघ तयार केले. या दोन्ही संघांनी 24 तासांत दोन भिन्न मैदानांवर सामना खेळला. बुधवारी पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडची पहिली कसोटी सुरू झाली. त्याचवेळी इंग्लंडचा एकदिवसीय संघ आयर्लंडशी तिसरा एकदिवसीय सामना खेळला.
करोनामुळे आता येत्या काळात अत्यंत मर्यादित कालावधीत जास्त नफा मिळावा या उद्देशाने इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने आपले दोन संघ तयार केले. त्यातील एक संघ आता पाकिस्तानशी कसोटी सामना खेळत आहे. तर, दुसरा संघ आयर्लंडशी तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा एकदिवसीय सामना खेळत होता.
या सामन्यांसाठी कसोटी संघाचे नेतृत्व ज्यो रूटकडे तर, एकदिवसीय संघाचे नेतृत्व इयान मॉर्गनकडे होते. या निर्णयामुळे इंग्लंड मंडळाला प्रायोजकांची करारबद्ध असलेली रक्कम कोणत्याही कपातीशिवाय मिळणार आहे. त्यामुळे गेले पाच महिने क्रिकेट ठप्प असले तरीही त्यांना फारसे नुकसान होणार नाही. आता अशाच पद्धतीने जागतिक क्रिकेटमधील अन्य काही देशांची क्रिकेट मंडळेही येत्या काळात दोन संघ खेळवतील अशी शक्यताही वाढली आहे.