इंग्लंड-विंडीज पहिली कसोटी, जागतिक क्रिकेटला दिलासा
साऊदम्पटन – करोनानंतरचे क्रिकेट कसे असेल याची कल्पना जगभरातील क्रिकेट शौकिनांना येणार आहे. गेले तीन महिने खीळ बसलेल्या जागतिक क्रिकेटला इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याने येथे प्रारंभ होत आहे.
मार्च महिन्यात करोनाचा धोका वाढल्याने संपूर्ण क्रीडाक्षेत्र ठप्प झाले होते. आता पूर्वीप्रमाणे जागतिक क्रीडाक्षेत्र सुरू झालेले नसले तरीही या दोन संघांतील कसोटी सामना सुरू हेत असल्याने दिलासादायक चित्र निर्माण होणार आहे. प्रत्यक्ष सामन्यात सहभागी होताना क्रिकेटपटूंना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, एकमेकांशी हस्तांदोलन न करणे, चेंडूवर लाळ तसेच घाम न लावणे तसेच ड्रेसिंगरूममध्ये व आवश्यक त्या सर्व ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करणे आदी नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यापूर्वी खेळाडूंना सराव सत्रात याचाही सराव करावा लागणार आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या एका प्रायोगिक लढतीत प्रमुख खेळाडूंनी या नियमांचे तंतोतंत पालन केले होते. अर्थात, काही वेळा त्यांच्याही लक्षात काही गोष्टी आल्या नाहीत.
इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका होत असून त्यातील पहिला सामना येथे बुधवारपासून सुरू होत आहे. मात्र, या मालिकेत प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार नसून त्यांना सामन्यांचा आनंद थेट प्रक्षेपणाद्वारेच घ्यावा लागणार आहे.
पंचांची भूमिका महत्त्वाची …
जागतिक क्रिकेटला प्रारंभ होत असला तरी खेळाडूंपेक्षाही जास्त महत्त्वाची भूमिका पंचांची राहणार आहे. चेंडूबाबतचे नियम तसेच करोनाबाबतची काळजी खेळाडू घेतात की नाही याकडे त्यांना सातत्याने लक्ष द्यावे लागणार आहे.