#CWC19 : इंग्लंड व न्यूझीलंडमध्ये आज निर्णायक सामना

स्थळ- रिव्हरसाईड मैदान, चेस्टरलेस्ट्रीट
वेळ- दु. 3 वा.

चेस्टरलेस्ट्रीट – घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंग्लंडला विश्‍वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी न्यूझीलंडच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. बाद फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंडलाही हा सामना महत्त्वाचा असल्यामुळे दोन्ही संघांकरिता ही लढत निर्णायकच असणार आहे.

भारतासारख्या तुल्यबळ संघावर मात केल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या बाद फेरीच्या आशा वाढल्या आहेत. आठव्या सामन्याअखेर त्यांचे 10 गुण झाले आहेत. न्यूझीलंडची अपराजित्त्वाची मालिका पाकिस्तान संघाने सनसनाटी विजयासह रोखली होती. त्यांचे 11 गुण असून हा सामना जिंकला तर त्यांना बाद फेरीची संधी मिळेल.

जेसन रॉयच्या पुनरागमनामुळे इंग्लंडच्या फलंदाजीची बाजू बळकट झाली आहे. जॉनी बेयरस्टो याने भारताविरूद्ध केलेल शतक ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्याचप्रमाणे बेन स्टोक्‍स हा सध्या अतिशय फॉर्ममध्ये असून त्याच्या जोडीला कर्णधार इऑन मॉर्गन व जोस बटलर यांच्यावरही त्यांच्या फलंदाजीची मदार आहे. गोलंदाजीत त्यांना मोईन अली, जोफ्रा आर्चर, मार्क वुड यांच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.

न्यूझीलंडचे गोलंदाज सुरुवातीला चांगले नियंत्रण ठेवतात मात्र, त्यांचा प्रभाव राहत नाही असा अनुभव वेस्ट इंडिज व पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यांचे वेळी दिसून आला आहे. विंडीजला त्यांच्याविरूद्ध विजयाची संधी साधता आली नाही. अखेरच्या लढतीत त्यांच्या ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन व मिचेल सॅंटनर यांच्यावर त्यादृष्टीने मोठी जबाबदारी आहे. फलंदाजीत कर्णधार केन विल्यमसन , रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रॅंडहोम, जेम्स नीशाम यांच्यावर त्यांची भिस्त आहे. विल्यमसन याने या स्पर्धेत दोन शतके केली आहेत. त्याच्याकडून त्याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची आशा आहे.

प्रतिस्पर्धी संघ-

इंग्लंड – इऑन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), जॉनी बेयरस्टो, जेम्स विन्स, बेन स्टोक्‍स, मोईन अली, जोफ्रा आर्चर, टॉम करन, लायन डॉसन, लीयाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, ख्रिस वोक्‍स, मार्क वुड.

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टील, मॅट हेन्री, कॉलिन मुन्रो, जेम्स नीशाम, हेन्री निकोल्स, मिचेल सॅंटनर, इश सोधी, टीम साऊदी.

Leave A Reply

Your email address will not be published.