#CWC2019 : ‘ऑरेंज आर्मी’ ला उपांत्य फेरीचे वेध

भारत विरूध्द इंग्लंड सामना : इंग्लंडकडून चिवट लढत अपेक्षित

वेळ – दु. 3.00 वा.
स्थळ – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

बर्मिंगहॅम – विजेतेपदाचा दावेदार असलेला भारतीय संघ ऑरेंज जर्सीमध्ये आजचा सामना खेळणार आहे. या सामन्यात इंग्लंडला पराभूत करीत उपांत्य फेरी गाठण्याचे वेध भारताला लागले असून बाद फेरीसाठी उत्सुक असलेल्या इंग्लंडलाही या लढतीत विजय मिळविणे अनिवार्य आहे. दोन्ही संघांच्या चाहत्यांसाठी “सुपरसंडे” साजरा करण्याची योग्य संधी आहे.

भारताने आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने जिंकले असून न्यूझीलंडबरोबरचा सामना पावसामुळे धुवून गेला होता. हे अपराजित्त्व राखण्यासाठी भारतीय संघ कसोशीने प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत विजयासाठी भारताला संघर्ष करावा लागला असला तरी त्यानंतरच्या सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजला धूळ चारली आहे. या एकतर्फी विजयामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्‍वास आणखीनच बळकट झाला आहे.

कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, केदार जाधव यांच्यावर भारताच्या फलंदाजीची भिस्त आहे. युवा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याचे अपयश हीच समस्या आहे. त्याच्या जागी दिनेश कार्तिक व ऋषभ पंत यांच्यापैकी एका खेळाडूस संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

भुवनेश्‍वर कुमार जखमी झाल्यानंतर त्याच्या जागी आलेल्या मोहम्मद शमी याने या स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये एका हॅट्ट्रिकसह आठ विकेट्‌स घेतल्या आहेत. आजही त्याच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे. जसप्रीत बुमराह याने किफायतशीर गोलंदाजी केली आहे. त्याच्याबरोबरच युझवेंद्र चहल, कुलदीप यादव व पांड्या यांच्यावरही मदार आहे.

कर्णधार इऑन मॉर्गन, जोस बटलर, जॉनी बेयरस्टो या मानांकित खेळाडूंकडून अपेक्षेइतकी सातत्यपूर्ण कामगिरी झालेली नाही. बेन स्टोक्‍स हा त्यांच्यासाठी एकांडा शिलेदार राहिला आहे. बाद फेरीत स्थान मिळवायचे असेल तर त्यांना सर्वच आघाड्यांवर सर्वोच्च कौशल्य दाखवावे लागणार आहे. त्याला अन्य खेळाडूंकडून कशी साथ मिळते यावरच त्यांच्या संघाचे यशापयश अवलंबून आहे.

प्रतिस्पर्धी संघ :

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल, ऋषभ पंत

इंग्लंड – इऑन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), जॉनी बेयरस्टो, जेम्स विन्स, बेन स्टोक्‍स, मोईन अली, जोफ्रा आर्चर, टॉम करन, लायन डॉसन, लीयाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, ख्रिस वोक्‍स, मार्क वुड.

Leave A Reply

Your email address will not be published.