विजयी मालिका राखण्यासाठी ऑस्ट्रेलिया प्रयत्नशील
लंडन – ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला झटपट बाद करणे हीच इंग्लंडच्या गोलंदाजांपुढील मुख्य समस्या असून त्यादृष्टीनेच जोफ्रा आर्चर या युवा गोलंदाजाकडे पाहिले जात आहे. दुखापतीमुळे पहिल्या कसोटीस मुकलेल्या आर्चरच्या पुनरागमनामुळे इंग्लंड संघाची बाजू वरचढ झाली आहे. या दोन संघांमधील ऍशेस मालिकेतील दुसरा सामना आजपासून येथील लॉर्डस मैदानावर सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळविला होता.
ऑस्ट्रेलियास गेल्या 18 वर्षांमध्ये इंग्लंडच्या मैदानावर ऍशेस मालिका जिंकता आलेली नाही. पहिल्या सामन्यातील विजयामुळे त्यांच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारा स्मिथकडून आजही चांगल्या कामगिरीची आशा आहे. त्याच्याप्रमाणेच डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यु वेड यांच्यावरही त्यांची भिस्त आहे. पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात प्रभावी फिरकी मारा करणारा नॅथन लायन आजही चांगले यश मिळवील, अशी अपेक्षा आहे. त्याच्याबरोबरच पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क यांच्यावर त्यांच्या गोलंदाजीची मदार आहे.
आर्चरने विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात चांगले यश मिळविले होते. दुखापतीमुळे जेम्स अँडरसन हा ऍशेस मालिकेत खेळू शकणार नाही. त्याची उणीव भरून काढण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्याच्याबरोबरच स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स, ख्रिस व्होक्स यांच्याकडून भेदक माऱ्याची अपेक्षा आहे.
प्रतिस्पर्धी संघ –
इंग्लंड – जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, जेसन रॉय, जो डेन्ली, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ख्रिस व्होक्स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, सॅम क्युरन.
ऑस्ट्रेलिया – टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेड, कॅमेरून बॅनक्रॉफ्ट, मार्कोस हॅरिस, जोश हॅझलवुड, उस्मान ख्वाजा, मार्नुस लॅबशाग्ने, नॅथन लायन, मिचेल मार्श, मिचेल नेसेर, जेम्स पॅट्टीसन, पीटर सिडल, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर.