स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
वेळ : दु. 3 वा.
मॅंचेस्टर – कर्णधार इऑन मॉर्गन व जेसन रॉय यांच्या दुखापतीची समस्या इंग्लंडला जाणविणार असली तरी आज अफगाणिस्तानविरुद्ध सोपा पेपर असल्यामुळे त्यांना हा सामना जिंकून उपांत्य फेरीसाठी आपले स्थान बळकट करण्याचे वेध लागले आहेत.
अफगाणिस्तानकडे आश्चर्यजनक विजय नोंदविण्याची क्षमता असली तरी येथे त्यांना तशी कामगिरी करता आलेली नाही. हे लक्षात घेतल्यास हा सामना जिंकताना अडचण येणार नाही. जरी मॉर्गन व रॉय हे दोघेही खेळू शकले नाहीत तरीही त्यांच्या अनुपस्थितीत सामना जिंकण्याची क्षमता त्यांच्या अन्य सहकाऱ्याकडे निश्चित आहे. जोस बटलर, जॉनी बेयरस्टो, जेम्स विन्स, बेन स्टोक्स हे फलंदाजीत अतिशय अनुभवी खेळाडू आहेत. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर, लियाम प्लंकेट, जो रूट, आदिल रशीद यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मॉर्गनच्या अनुपस्थितीत उपकर्णधार बटलर हा इंग्लंडचे नेतृत्व करील. पाकिस्तानकडून जरी इंग्लंडला पराभव पत्करावा लागला असला तरी आजच्या सामन्यात इंग्लंडचा वरचष्मा राहील असा अंदाज आहे.
अफगाणिस्तानला या स्पर्धेत निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले आहे. त्यांना आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यांमध्ये पराभूत व्हावे लागले आहे. या चारही सामन्यांमध्ये त्यांना 40 षटकेही खेळता आलेली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर त्यांचा डाव साफ कोलमडतो असेच चित्र दिसून आले आहे.
हझरतुल्ला झईझई व नूर अली झाद्रान यांनी दक्षिण आफ्रिकेबरोबर झालेल्या लढतीत जोरदार सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर त्यांचा डाव कोलमडला होता. श्रीलंकेविरुद्ध अफगाणिस्तानने जवळजवळ विजय समीप आणला होता. तथापि त्यांना या संधीचा लाभ घेता आला नाही. त्यांचा रशीद खान याने अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू होण्याच्या दिशेने वाटचाल
केली आहे.
प्रतिस्पर्धी संघ
अफगाणिस्तान – गुलाबदीन नईब (कर्णधार), आफ्ताब आलम, अझगर अफगाण, दौलत झारदान, हमीद हसन, हशमतुल्ला शाहिदी, हझरतुल्ला झईझई, मोहम्मद नबी, रहमत शाह (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नजीबुल्ला झाद्रान, नूर अली झाद्रान, रशीद खान, समीउल्ला शिनवारी.
इंग्लंड – इऑन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), जॉनी बेयरस्टो, जेम्स विन्स, बेन स्टोक्स, मोईन अली, जोफ्रा आर्चर, टॉम करन, लायन डॉसन, लीयाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, ख्रिस वोक्स, मार्क वुड.