#ENGvAUS : दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

लंडन – ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने दोन्ही डावांत केलेले शतक आणि नॅथन लायनच्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ऍशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकला. या पराभवामुळे यजमान इंग्लंड 0-1 अशा पिछाडीवर गेले असून दुसरा सामना 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंड संघाने शनिवारी 12 सदस्यीय संघ जाहीर केला असून त्यात फिरकीपटून मोईन अलीला डच्चू देण्यात आला आहे. तर, जोफ्रा आर्चर या कसोटीतून पदार्पण करण्याची शक्‍यता आहे.

दुखापतीमुळे जेम्स अँडरसनने माघार घेतल्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज आर्चरला संधी मिळू शकेल. एजबॅस्टनला झालेला पहिला कसोटी सामना इंग्लंडने 251 धावांनी गमावला होता. दुखापतीमुळे आर्चरला पहिल्या सामन्यात खेळता आले नव्हते. ऑफ-स्पिनर मोईन अलीच्या जागी डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीचला इंग्लंडच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

तर, वेगवान गोलंदाज ऑली स्टोनने पाठीच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आर्चर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. ससेक्‍स सेकंड इलेव्हन संघाचे प्रतिनिधित्व करताना आर्चरने 27 धावांत 6 विकेट्‌स घेत ग्लोसेस्टरशायर संघाचा डाव 79 धावांत गुंडाळला. त्यानंतर फलंदाजीतही चमक दाखवताना 99 चेंडूंत 108 धावा चोपल्या. जुलै महिन्यात आयर्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी लीच इंग्लंडकडून खेळला होता. सलामीला येत त्याने 92 धावांची खेळी केली.

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ :

जो रूट ( कर्णधार), जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुरन, जोए डेन्ली, जऐक लीच, जेसन रॉय, बेन स्टोक्‍स, ख्रिस वोक्‍स.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.