PAK vs ENG Test Seires | पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने 17 जणांचा संघ जाहीर केला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बेन स्टोक्सची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बेन स्टोक्स श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सहभागी झाला नव्हता. मात्र, तो आता ऑक्टोबरमध्ये शान मसूदच्या संघाविरुद्धच्या कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
ऑफस्पिनर जॅक लीचचेही दुखापतीतून दीर्घकाळानंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. हैदराबादमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत लीचला गुडघ्याला दुखापत झाली होती. हैदराबादमधील पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना चेंडू लागल्याने फिरकीपटू दुखापतग्रस्त झाला होता. त्याचबरोबर श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जोश हललाही संघात कायम ठेवण्यात आले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर सलामीवीर जॅक क्रॉलीचे संघात पुनरागमन झाले आहे. जुलैमध्ये एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या कसोटीदरम्यान त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीला फ्रॅक्चर झाले होते. संघात पुनरागमन करण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे.
🦁 Happy with our squad? 🏏
🇵🇰 #PAKvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/VBAryp083p
— England Cricket (@englandcricket) September 10, 2024
सात वेगवान गोलंदाजांना मिळाले स्थान….
पाकिस्तान दौऱ्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात 7 वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. या संघात रेहान अहमद या स्पेशालिस्ट लेगस्पिनरसह चार फिरकीपटूंचाही समावेश आहे.
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड कसोटी संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, जॅक क्रॉली, बेन डकेट, जोश हल, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, ऑली स्टोन ,ख्रिस वोक्स.
पाकिस्तान आणि इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक : इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 7 ऑक्टोबरपासून मुलतानमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान तर 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान शेवटची कसोटी खेळवली जाणार आहे.