#CWC19 : जॉनी बेयरस्टोचे दमदार शतक; न्यूझीलंडसमोर 306 धावांचे लक्ष्य

चेस्टरलेस्ट्रीट – सलामीवीर जॉनी बेयरस्टोचे दमदार शतक आणि जेसन रॉय याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंड संघासमोर 306 धावांचे आव्हान ठेवले आहे. जॉनी बेयरस्टो आणि जेसन रॉय यांनी 123 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र, त्याचा फायदा इंग्लंडला घेता आला नाही. त्यामुळे इंग्लंडचा संघ 50 षटकांत 8 बाद 305 धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला.

तत्पूर्वी इंग्लंडचा कर्णधार इआॅन मॉर्गन याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला होता. सलामीवीर जॉनी बेयरस्टोने 99 चेंडूत (15 चौकार व 1 षटकार) 106 तर जेसन रॉय याने 61 चेंडूत (8 चौकार) 60 धावा केल्या. बेयरस्टो आणि रॉय यांनी भक्कम पाया रचल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजानी निराशाच केली. कर्णधार इआॅन मॉर्गन याने 40 चेंडूत 42 धावा केल्या. मॉर्गनचा अपवाद वगळता अन्य फलंदाजाना मात्र सूर गवसला नाही. जो रूट (24), जोस बटलर (11) आणि बेन स्टोक्स (11) धावा काढून माघारी परतले.

न्यूझीलंडकडून मॅट हेनरी, ट्रेंट बोल्ट आणि जिमी नीशम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले, तर टिम साउदी आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दरम्यान, उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघासाठी आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. भारतासारख्या तुल्यबळ संघावर मात केल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या बाद फेरीच्या आशा वाढल्या आहेत. आठव्या सामन्याअखेर त्यांचे 10 गुण झाले आहेत. न्यूझीलंडची अपराजित्त्वाची मालिका पाकिस्तान संघाने सनसनाटी विजयासह रोखली होती. त्यांचे 11 गुण असून हा सामना जिंकला तर त्यांना बाद फेरीची संधी मिळेल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.