#ICCWorldCup2019 : जेसन रॉयची दीड शतकी खेळी, इंग्लंडचा बांगलादेशपुढे 386 धावांचा डोंगर

टॉन्टन – सलामीवीर जेसन रॉयची दमदार दीडशतकी खेळी तर जोस बटलर आणि जॉनी बेयर्सटो यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभा करत बांगलादेशसमोर विजयासाठी 387 धावांचे आव्हान ठेवले आहे.

बांगलादेशचा कर्णधार मशरफे मोर्तज़ा याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केलं होत, मात्र इंग्लंडच्या फलंदाजानी मशरफे मोर्तजाचा निर्णय़ साफ चुकीचा ठरवला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 386 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. त्यामुळे बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी 50 षटकांत 387 धावा कराव्या लागणार आहेत.

इंग्लंडकडून जेसन रॉयने 121 चेडूंत 14 चौकार आणि 5 षटकारासह सर्वाधिक 153 धावा केल्या. तर जॉनी बेयर्सटोने 51 धावा केल्या. जेसन रॉय आणि जॉनी बेयर्सटो यांनी पहिल्या विकेटसाठी 128 धावांची भागिदारी करत चांगली सुरूवात केली. मधल्या फळीत जोस बटलरने 64, इयोन मॉर्गनने 35, जो रूटने 21 तर क्रिस वोक्सने 8 चेंडूत नाबाद 18 आणि लियाम प्लंकेटने 9 चेंडूंत नाबाद 27 धावा करत संघास मोठी धावसंख्या उभारू दिली.

बांगलादेशकडून मेहंदी हसन आणि मोहम्मद सैफुद्दीन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले तर मुस्ताफिजुर रहमान आणि मशरफे मोर्तजाने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.