#INDvENG 1st ODI | भारताची विजयी सलामी

भारताचा इंग्लंडवर 66 धावांनी दणदणीत विजय

पुणे – भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीला आलेले अपयश भरून काढताना इंग्लंडच्या आक्रमकतेला वेसण घातली. पदार्पण करणारा प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्‍वर कुमार यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात 66 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी देत 1-0 अशी आघाडी घेतली.

भारताने विजयासाठी दिलेल्या 318 धावांचा पाठलाग करताना आक्रमक प्रारंभानंतरही इंग्लंडचा डाव 43 व्या षटकांत 251 धावांवर संपला व भारताने 66 धावांनी विजय मिळवला. मात्र, या सामन्यात ज्या पद्धतीने सलामीवीर जेसन रॉय व जॉनमी बेअरस्टो यांनी धडाक्‍यात सुरुवात केली होती. ते पाहता भारतीय संघाचा 40 षटकांतच पराभव होणार अशीच चिन्हे दिसत होती. मात्र, रॉय बाद झाला आणि सामन्याचे चित्रच पालटले. सामन्यावर पुन्हा एकदा भारतीय संघाने नियंत्रण मिळवले.

पदार्पण केलेल्या प्रसिध कृष्णा व शार्दुल ठाकूर यांच्यासह अनुभवी भुवनेश्‍वर कुमारने इंग्लंडला ठरावीक अंतराने धक्के दिले. बिनबाद 135 अशा सुस्थितीत असलेल्या इंग्लंडचा नंतरच्या केवळ 116 धावांत संपूर्ण संघ बाद झाला. जॉनी बेअरस्टो देखील भारताच्या शिखर धवनसारखा कमनशिबी ठरला. त्यालाही शतक पूर्ण करता आले नाही. त्याने आपल्या 94 धावांच्या खेळीत भारतीय गोलंदाजांची झोप उडवली होती. या खेळीत त्याने 66 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व तब्बल 7 षटकार फटकावले.

सलामीवीर जेसन रॉयनेही आक्रमक फलंदाजी करताना 35 चेंडूत 7 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. त्यानंतर मोईन अलीने केलेल्या 30 धावांच्या केळीचा आपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला यश आले नाही. भारताकडून प्रसिध कृष्णाने सर्वाधिक 4 गडी बाद केले. शार्दुल ठाकूरने 3 तर भुवनेश्‍वर कुमारने 2 गडी बाद केले. कृणाल पंड्याने एक गडी बाद केला.

तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनचा हा निर्णय भारतीय फलंदाजांनी चुकीचा ठरवला. सलामीवीर हिटमॅऩ रोहित शर्मा व शिखऱ धवन यांनी 62 धावांची सलामी दिली. रोहित स्थिरावल्यानंतरही बाद झाल्यावर धवनने कर्णधार विराट कोहलीसह संघाचा डाव सावरत इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याच्या सुरात सुर मिसळत कोहलीनेही आक्रमक फलंदाजी केली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 105 धावांची भागीदारी केली. 

या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण करताना संघालाही दीडशतकी मजल मारुन दिली. कोहली आनावश्‍यक फटका मारत 60 चेंडूत 6 चौकारांसह 56 धावा करुन बाद झाला. दुसरीकडे धवन आपल्या शतकाकडे वाटचाल करत असताना ते पूर्ण करण्यात अपयशी ठरला. ते 106 चेंडूत 11 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 98 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यरही लवकर परतला. अष्टपैलू हार्दिक पंड्यशानेही निराशा केली. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या जागी संघात परतलेला लोकेश राहुल याने मात्र, धिराने खेळ केला व आपण भरात येत असल्याचे सिद्ध केले. 

धवन बाद झाल्यावर राहुलला साथ देण्यासाठी कृणाल पंड्या खेळपट्टीवर आला व या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजीला एखाद्या क्‍लब दर्जाच्या गोलंदाजीसारखे वागवले. चौफेर टोलेबाजी करत या दोघांनीही संघाला त्रिशतकी धावांपेक्षाही जास्त पल्ला गाठून दिला. या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली. या दोघांनी केवळ 57 चेंडूत 112 धावांची अभेद्द भागीदारी केली. राहुल 43 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 62 धावांवर नाबाद राहिला. पंड्यानेही आक्रमक खेळ करताना 31 चेंडूत 7 चौकार व 2 षटकार फटकावताना नाबाद 58 धावा केल्या.

या सामन्यासाठी पंतच्या जागी राहुलला खेळवण्याच्या कोहलीचा निर्णय सार्थ ठरला. तसेच कोहलीने या सामन्यासाठी संघात कृणाल पंड्या, कुलदीप यादव व प्रसिध कृष्णा यांना संधी दिली. इंग्लंडकडून बेन स्टोक्‍सने 3 तर, मार्क वुडने 2 गडी बाद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.