अबुधाबी : – टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी सुपर 12 फेरीतील झालेल्या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव केला. या फेरीत इंग्लंडचा हा दुसरा विजय ठरला आहे. बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लाहने नाणेफेक जिंकून इंग्लंडसमोर विजयासाठी 125 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान इंग्लंडने 15 व्या षटकातच दोन गडी गमवून पूर्ण केले.
बांगलादेशने डाव सुरू केल्यावर त्यांच्या फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजीचा सामना करता येत नव्हता. त्यांचे 4 गडी संघाच्या 10 षटकांचा खेळ होइपर्यंत गमावले होते. लिंटन दास आणि महंमद नइम बाद झाल्यानंतर तर त्यांच्या फलंदाजांवरचे दडपण आणखी वाढले. मुशफिकुर रहिम, कर्णधार महंमदुल्लाह, नसूम अहमद व नुरुल हसन यांनी थोडीफार लढत दिल्याने त्यांना संघाला 9 बाद 124 धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून तायमल मिल्सने 3 गडी बाद केले. लियाम लिव्हिंगस्टोन व मोईन अली यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. ख्रिस वोक्सने 1 गडी बाद केला.
विजयासाठी दिलेले आव्हान इंग्लंडने 2 गडी गमावून 14.1 षटकांत 126 धावा करत पार केला. इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जोस बटलर या सलामीवीरांनी थाटात सुरूवात केली. मात्र, संघाच्या 39 धावा झाल्यावर बटलर 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर रॉयने डेविड मलानसह दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली.
रॉयने अर्धशतक पूर्ण केले मात्र, धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 38 चेंडूत 5 चौकार व 3 षटकार फचकावून 61 धावांवर बाद झाला. मलानने जॉनी बेअरस्टोच्या साथित संघाचा विजय साकार केला. मलान 28 धावांवर तर, बोअरस्टो 8 धावांवर नाबाद राहिले. बांगलादेशकडून नुसुम अहमद व शेरीफुल इल्साम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – बांगलादेश – 20 षटकांत 9 बाद 124 धावा. (मशफिकुर रहिम 29, महंमदुल्लाह 19, नसूम अहमद 19, तायमल मिल्स 3-27, लियाम लिव्हिंगस्टोन 2-15, मोईन अली 2-18, ख्रिस वोक्स 1-12). इंग्लंड – 14.1 षटकांत 2 बाद 126 धावा. (जोस बटलर 18, जेसन रॉय 61, डेव्हीड मलान नाबाद 28, जॉनी बेअरस्टो नाबाद 8, नुसुम अहमद 1-26, शेरीफुल इल्साम 1-26).