#ENGvsAUS : ऍशेससाठी इंग्लंडचा संघ जाहीर

बेन स्टोक्‍स सह जोफ्रा आर्चरचा समावेश

लंडन  – विश्‍वचषक विजयानंतर इंग्लंड संघाने पारंपरिक ऍशेस मालिकेसाठी दंड थोपटले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाने शनिवारी 14 सदस्यीय संघ जाहीर केला.आयर्लंड संघाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात सुमार दर्जाची कामगिरी केल्यानंतर इंग्लंडच्या संघात ऍशेस मालिकेसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत.
एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवणाऱ्या जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्‍स या दोघांनाही संघात पहिल्या कसोटीसाठी स्थान देण्यात आले आहे.

जोफ्रा आर्चरसाठी ही पदार्पणाची कसोटी असणार आहे, तर आयर्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात विश्रांती दिलेल्या बेन स्टोक्‍स आणि जोस बटलर या दोघांचे संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय बेन स्टोक्‍स याला संघाच्या उपकर्णधारपदी बढती देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेस मालिका फारच चर्चेत असते, त्यातच विश्‍वचषक स्पर्धेच्या उपान्त्य सामन्यात प्रथमच ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे यंदाच्या ऍशेस मालिकेतही या दोन्ही संघांमध्ये जबरदस्त चुरस पहायला मिळेल. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गुरुवारी सुरु होणार आहे.

24 वर्षीय आर्चरने विश्‍वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत 20 गडी माघारी धाडले. अतिशय दडपणाचा स्थितीमध्ये त्याने सुपर ओव्हरदेखील टाकली आणि सामना बरोबरीत रोखत इंग्लंडला विजय प्राप्त करून दिला. याशिवाय त्याने 2016 पासून 28 प्रथम श्रेणी सामन्यांत 131 गडी बाद केले. त्याच्या या धमाकेदार कामगिरीची दखल घेत त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे.

तर, जोफ्रा आर्चरने 3 मे 2019ला आयर्लंडविरुद्धच्या डब्लिन एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या संघाकडून पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने 8 ओव्हर 40 धावा देत एक विकेट मिळवली. यानंतर निवडसमितीने त्याला पाकिस्तानविरुद्धच्या एकमेव टी-20 सामन्यात आणि 5 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघात सामील केले. विश्‍वचषक सुरू होण्याच्या 3 आठवडेआधी मिळालेल्या या संधीचा आर्चरने पुरेपूर फायदा घेतला आणि स्वत:ला सिद्ध केले.

ऍशेस मालिकेसाठीचा इंग्लंडचा संघ – जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, सॅम करन, जो डेन्टली, जेसन रॉय, बेन स्टोक्‍स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्‍स.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.