#ICCWorldCup2019 : इंग्लंडचा आफ्रिकेवर दणदणीत विजय

लंडन – 12 व्या विश्‍वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 105 धावांनी पराभव करत आपल्या विश्‍वचषक अभियानाची विजयी सुरुवात केली.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 311 धावांची मजल मारत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 312 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात खेळताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 39.5 षटकांत 207 धावांमध्येच गारद झाला.

311 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र, हाशिम आमलाला चेंडू लागल्याने तो रिटायर्ड होऊन परतल्यानंतर आलेला एडन मर्क्रम 13 तर कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस 5 धावा करून परतल्याने आफ्रिकेचा डाव अडचणीत आला. मात्र, यानंतर क्विंटन डी कॉक आणि रसी व्हॅन डर दुसे यांनी संघाचा डाव सावरला. मात्र, डी कॉक 68 धावा करून परतल्यानंतर पुन्हा आफ्रिकेच्या डावाला गळती लागली. यानंतर इतर फलंदाज केवळ हजेरी लावत असताना दुसेने डाव सावरत आपले अर्धशतक झळकावले. मात्र, 50 धावा करून तो ही परतल्यानंतर इतर फलंदाजांनी केवळ हजेरीवीराची भूमिका बजावल्याने आफ्रिकेचा डाव 207 धावांत संपुष्टात आला. यावेळी इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने तीन गडी बाद केले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रो पहिल्याच षटकांत माघारी गेला. यानंतर आलेला जो रूट आणि दुसरा सलामीवीर जेसन रॉय यांनी सावध खेळ करत संघाची धावगती वाढवण्यावर भर देत 17 व्या षटकांत इंग्लंडला शंभरी पार करून देत आपापली अर्धशतके पूर्ण केली. अर्धशतकानंतर लागलीच जेसन रॉय 54 तर रूट 51 धावा करुन बाद झाले.

दोघे बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव कर्णधार इऑन मॉर्गन आणि बेन स्टोक्‍स यांनी सावरला. दोघांनीही फटकेबाजी करत इंग्लंडला 150 धावांची मजल ओलांडून दिली. त्याच बरोबर मॉर्गनने अर्धशतक झळकावले. यानंतर स्टोक्‍सने फटकेबाजी करत इंग्लंडला द्विशतकी मजल ओलांडून दिली. तर, त्याने आपले अर्धशतकही झळकावत मॉर्गनसोबत चौथ्या गड्यासाठी 100 धावांची भागीदारी पुर्ण केली. मात्र, 57 धावा करून मॉर्गन परतला. यानंतर स्टोक्‍सने फटकेबाजी करत इंग्लंडला 300 धावांची मजल मारून दिली. यावेळी स्टोक्‍स 89 धावा करून तो परतला. यानंतर लियाम प्लंकेट आणि जोफ्रा आर्चर यांनी इंग्लंडला 311 धावांची मजल मारून दिली.

संक्षिप्त धावफलक –

इंग्लंड 50 षटकांत 8 बाद 311 (बेन स्टोक्‍स 89, इऑन मॉर्गन 57, एन्गिडी 3-66). दक्षिण आफ्रिका 39.5 षटकांत सर्वबाद 207 (डी कॉक 68, दुसे 50, जोफ्रा आर्चर 3-27).

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×