अभियंत्यांना रोजगाराची ‘लॉटरी’ लागेना

नशिबी निराशा : कामांअभावी सार्वजनिक बांधकाम विभागाची सोडत रद्द

पुणे – राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तीन लाखांपर्यंतची कामे उपलब्ध करुन दिली जातात. मात्र, गेल्या महिनाभरात या रकमेऐवढी विकासकामेच निघाली नसल्याने सोमवारी (दि.5) काढली जाणारी कामाची सोडत (लॉटरी) रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता बेरोजगार अभियंत्यांसमोरच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे देण्यासाठी बांधकाम विभागाने ही योजना सुरू केली आहे. स्थापत्य अभियंत्यांना तीन लाख रुपयांची कामे विनास्पर्धा देण्याचाही निर्णय घेतला आहे. बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने विनास्पर्धा कामे दिली जातात. त्यासाठी विकासकामांची सोडत (लॉटरी) काढून, त्याचे वाटप केले जाते. यामुळे अनेक अभियंत्यांना शासकीय कामे मिळत आहेत. यातील काही अभियंते दहा-बारा वर्षे काम करीत आहेत. त्यांच्यासाठी कामाची मर्यादा वाढवून देण्याची आग्रही मागणी होत आहे. या कामांचे वाटप करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता कार्यालयात सूचना प्रसिद्ध केली जाते. राज्य सरकारच्या विविध विभागांकडून नोंदविलेल्या मागणीनुसार, तीन लाखापर्यंतची कामे करुन घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाकडून या सोडत पद्धतीचा अवलंब केला जातो. ही माहिती महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन, पुणे जिल्हा सुशिक्षित बेकार अभियंता असोसिएशनबरोबरच अन्य संघटनांना कळविली जाते. त्यानुसार या सोडतीचे आयोजन केल्याचे जाहीर केले जाते.

गेल्या आर्थिक वर्षात या रकमेची जवळपास 200 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जलसंधारण विभागाच्या कामांचा यात सर्वाधिक समावेश होता. आज होणाऱ्या नियोजित सोडतीसाठी तीन लाख रुपयांपर्यंतच्या कामाची मागणी न झाल्याने ही सोडत रद्द करण्यात आली आहे. विविध विभागांकडून होणाऱ्या मागणीनुसार ही सोडत आयोजित केली जाईल.
– एस.व्ही. राठोड, लिपिक, निविदा विभाग, सा.बां.विभाग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.