पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रत्यक्षपणे अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २४ जुलैपर्यंत असून, अंतिम गुणवत्ता यादी २ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.
राज्य सीईटी सेलने अभियांत्रिकी पदवी प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे पाच वर्ष कालावधीचे पदव्युत्तर अभियांत्रिकीचे इंटिग्रेडेट अभ्यासक्रमाचे वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. सविस्तर वेळापत्रक राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी माहितीपुस्तिका वाचून काळजीपूर्वक अर्ज करावेत, असे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या अभियांत्रिकी प्रवेशाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. यापूर्वी १० जुलैपासून प्रवेश सुरू होतील, जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. अभियांत्रिकी प्रवेश ही ऑनलाइनद्वारे केंद्रीय पद्धतीने होणार आहे. प्रवेशाची सर्व प्रक्रिया राज्य सीईटी सेलमार्फत राबविण्यात येते. सध्यस्थितीत अंतिम गुणवत्ता यादीपर्यंत माहिती देण्यात आली. प्रत्यक्षात प्रवेशाची पहिली फेरी कधी सुरू होणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
अर्ज करण्यासाठी मुदत : १४ ते २४ जुलै
कागदपत्र तपासणी व अर्ज निश्चिती : १५ ते २५ जुलै
प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी : २७ जुलै
यादीवरील आक्षेपासाठी मुदत : २८ ते ३० जुलै
प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादी : २ ऑगस्ट