करोनामुळे यंदा संपूर्ण निकाल ऑनलाइन जाहीर
पुणे – नेहमी “अरे आव्वाज कुणाचा’, “करंडक कुणाचा’, “हिप हिप हुर्ये’ असा आरोळ्यांमध्ये दुमदुमणारे सभागृह.. विद्यार्थ्यांचा आनंद, जल्लोष.. आणि निकालाची उत्सुकता अशा वातावरण करंडक स्पर्धांचे पारितोषिक वितरण होते. मात्र, यंदा करोना पार्श्वभूमीवर फिरोदिया स्पर्धेचा संपूर्ण निकाल ऑनलाइन जाहीर झाला. यंदा करंडक आणि वैयक्तिक पारितोषिकांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांनी बाजी मारल्याचे चित्र आहे.
2020 च्या फिरोदिया करंडकांतर्गत घेण्यात येणाऱ्या आंतरविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मार्चमध्ये होणार होता. मात्र, करोना पार्श्वभूमीवर हा समारंभ रद्द केला असून, आयोजकांनी ऑनलाइन निकाल जाहीर केला. नाट्य, संगीत, नृत्य विभागासह स्पेशल इफेक्ट, युव्ही आर्ट, सॅन्ड आर्ट, थ्रेड आर्ट, लीलीपुट, शिल्पकला, ऑईल पेंटींग, ग्राफिटी, थ्रीडी मिनिएचर, टेप आर्ट आदी कला प्रकारांतील बक्षीसे जाहीर करण्यात आली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षण चंद्रकांत कुलकर्णी, शेखर ढवळीकर, नरेंद्र भिडे, सीमा देशमुख यांनी, तर प्राथमिक फेरीचे परीक्षण गिरिजा ओक-गोडबोले, उपेंद्र सिधये, सौरभ भालेराव, राजेंद्र पाटील, अमृता गोगटे यांनी केले होते.
पुढील वर्षीच्या स्पर्धेत एमआयटी ऍकडमी ऑफ इंजिनिअरिंग, फर्गसन महाविद्यालय, सिंहगड स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, विश्वकर्मा विद्यापीठ, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, झील एज्युकेशन संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, गरवारे वाणिज्य महाविद्यालय, मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, इंडियन लॉ सोसायटीचे विधी महाविद्यालय, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या महाविद्यालयांनी आपले स्थान निश्चित केले.