बंगळुरू – करोनाचा कर्नाटकात कहर सुरू असतानाही अभियांत्रिकीची पदवी आणि पदविका महाविद्यालये 17 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी दिली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विद्यार्थी व्यक्तिगतरित्या जाऊन अथवा ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. अथवा दोन्ही पद्धतीने उपस्थित राहण्याचा पर्याय उपलब्ध असेल. विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित राहू शकतील. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये उपस्थित राहायचे असेल त्यांना पालकांकडून संमतीपत्र आणावे लागेल. किती तास महाविद्यालय असेल, किती उपस्थिती असेल, वर्गात बसण्याची पद्धत काय असेल, या संदर्भातील आचारसंहिता लवकरच बनवण्यात येईल, असे ते म्हणाले.
अनुसूचित जाती, समाजकल्याण आणि ओबिसी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. त्यांच्या वाहतुकीसाठी सुविधा निर्माण करू, असे नारायण म्हणाले. नारायण यांच्याकडेच उच्च शिक्षण खात्याच्या पदभार आहे. या बैठकीस बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह आरोग्य, समाजकल्याण, मागास वर्ग, अथर, वाहतूक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह नारायण उपस्थित होते.