बेंगाळुरू – बेंगाळुरू येथील आयटी अभियंता अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणातील आरोपी पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या सासरच्या इतर तीन सदस्यांनी म्हणजेच निशा सिंघानिया, अनुराग सिंघानिया आणि सुशील सिंघानिया यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
सोमवारनंतर उच्च न्यायालयात यावर सुनावणी होऊ शकते. शुक्रवारी कर्नाटक पोलिसांनी मृत अतुल सुभाष यांची पत्नी निकिताचा भाऊ अनुराग सिंघानिया आणि आई निशा सिंघानिया यांना तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. दोघांनाही नोटीस बजावल्यानंतर तीन दिवसांत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बेंगळुरू पोलीस उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे पोहोचले होते. अतुलचे सासरचे घर जौनपूर येथील खोया मंडी येथे आहे. जिथे त्यांची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया आणि भावजय राहतात. पण, पोलीस आल्यावर घराला कुलूप दिसले.
पोलिस आल्याची माहिती मिळताच हे सर्व लोक फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी, अतुलच्या भावाच्या तक्रारीच्या आधारे कर्नाटक पोलिसांनी निकिताची आई, भाऊ आणि काकाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. अतुल सुभाष यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये या चौघांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाष यांनी 24 पानी सुसाईड नोट आणि 81 मिनिटांचा व्हिडिओ जारी केला होता. यामध्ये त्याने सासरच्या मंडळींवर छळ केल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी निकिताच्या आईने अतुलचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि केवळ निराशा व्यक्त करण्यासाठी त्याने तिच्या कुटुंबावर असे गंभीर आरोप केले आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही.
माझ्या भावाला न्याय मिळो
अतुल सुभाषचा भाऊ विकास म्हणाला, माझ्या भावाला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. या देशात अशी न्यायव्यवस्था निर्माण व्हावी, ज्याद्वारे पुरुषांना न्याय मिळावा, अशी माझी इच्छा आहे. मला अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करायची आहे जे या देशात कायदेशीर पदावर आहेत आणि भ्रष्टाचार करत आहेत. हे लोक असेच भ्रष्टाचार करत राहिले तर कुणालाही न्याय मिळणार नाही.