ENG vs SL, 2nd Test (Sri Lanka’s playing-11) : श्रीलंकेचा संघ उद्यापासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आमनेसामने येणार आहे. हा कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्सवर होणार आहे ज्यासाठी श्रीलंकेने प्लेइंग-11 जाहीर केले आहे. पहिल्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर लंकेला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणे भाग पडले आहे. श्रीलंकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले आहेत.
श्रीलंकेने कुसल मेंडिसला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याच्या जागी पथुम निसांकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर विश्व फर्नांडोच्या जागी लाहिरू कुमाराला संधी देण्यात आली आहे. मँचेस्टर कसोटीच्या दोन्ही डावात मेंडिसने एकूण 24 धावा केल्या होत्या, तर विश्व फर्नांडोला केवळ 2 विकेट घेता आल्या होत्या.
Sri Lanka announced playing XI for the 2nd Test Match, which will start tomorrow at the Lord’s Cricket Ground London.https://t.co/C4mvw0eQ97 #ENGvSL
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 28, 2024
कर्णधाराने केले निसांकाचे कौतुक…
पथुम निसांका बऱ्याच काळानंतर कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. निसांका 2 वर्षांपूर्वी शेवटची कसोटी खेळला होता. तेव्हापासून तो त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होता, ज्याची प्रतीक्षा आता संपली आहे. अलीकडेच निसांकाने भारताविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. एवढेच नाही तर या वर्षी वनडेमध्ये तो श्रीलंकेसाठी वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला होता.
मार्च 2021 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या निसांकाने जुलै 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाॅल येथे शेवटची कसोटी खेळली होती. निसांकाचे कौतुक करताना कर्णधार धनंजय डी सिल्वाने तो सध्या देशातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे सांगितले. श्रीलंकेच्या कर्णधाराने सांगितले की, निसांकाची मानसिकता आणि तंत्र उत्कृष्ट असून तो कोणत्याही फॉरमॅटशी जुळवून घेण्यास सक्षम आहे.
इंग्लंडने 27 ऑगस्ट रोजी लॉर्ड्स कसोटीसाठी त्यांचा संघ जाहीर केला, ज्यामध्ये दुखापतग्रस्त मार्क वुडच्या जागी ऑली स्टोनचा समावेश करण्यात आला आहे. एका बदलाव्यतिरिक्त, इंग्लंडने मँचेस्टर कसोटी जिंकण्यास मदत करणाऱ्या खेळाडूंना कायम ठेवले आहे. पहिली कसोटी 5 गडी राखून जिंकण्यात इंग्लंडला यश आले होते.
दुसऱ्या कसोटीसाठी श्रीलंकेचे प्लेइंग-11 : दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, धनंजय डी सिल्वा (कर्णधार), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रत्नायके.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचे प्लेइंग-11 : बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक (उपकर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, ऑली स्टोन. आणि शोएब बशीर.