पुणे – अलिकडच्या काळात वकिलांवर होणारे हल्ले वाढले आहेत. हे हल्ले रोखण्यासाठी राज्यात वकील संरक्षण कायदा लागू करण्यात यावा, या मागणीचे निवेदन पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संतोष खामकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी (दि. २८) दिले.
वकिलांवरील हल्ल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याअनुषंगाने कायदा त्वरीत लागू करण्याची आवश्यकता आहे. राजस्थानमध्ये २२ मार्च २०२३ मध्ये हा कायदा अंमलात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये वकिलांसाठी संरक्षण देणेसाठी कायदेशीर तरतुदी अंमलात आणणे गरजेचे आहे.
दरम्यान, कायद्यामधून काही प्रकरणांमध्ये पोलीस संरक्षण प्रदान करणे, न्यायपालिकेच्या प्रत्येक स्तरावर वकिलांसाठी एक निवारण समिती स्थापन करणे, वकिलांना बेकायदेशीर अटक आणि दुर्भावनापूर्ण खटल्यांपासून संरक्षण देणे, वकिलांसाठी जामीन बंध माफ करणे, विशेषाधिकारप्राप्त प्रकरणांमध्ये विस्तारित संरक्षण प्रदान करण्याची आवश्यकता असल्याचेही अॅड. खामकर यांनी नमूद केले.