पुणे – ऊर्जेचा अमर्याद स्रोत म्हणून नव्यानेच सिद्ध झालेल्या न्यूट्रिनो ऊर्जेकडे पाहिले जात आहे. ऊर्जेच्या या स्रोतापासून “न्यूट्रिनो व्होल्टाईक घट’ तयार करून विद्युत ऊर्जा मिळवण्यासाठी जर्मनीच्या न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप भारतात गुंतवणूक करणार आहे. यासंबंधी न्यूट्रिनो क्यूबला लागणारे क्रिटिकल मटेरियल विकसित करण्यासाठी पुण्यातील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिकशी (सी-मेट) सहकार्य करणार आहे. पुढील तीन वर्षात टेस्लाच्या धर्तीवर पूर्ण न्यूट्रिनो एनर्जीवरील स्वयं चार्जिंग होणारी “पाय-कार’ विकसित करण्यात येणार आहे.
पाषाण रस्त्यावरील “सी-मेट’मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जर्मनीच्या न्युट्रिनो ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॉलगर थोर्स्टन स्कुबर्ट व स्पेल टेक्नॉलॉजीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्रकुमार शर्मा यांनी दिली. प्रसंगी न्युट्रिनो ग्रुपचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. थोर्स्टन लुडविग, न्यूट्रिनो इंडियाचे संचालक (ऑपरेशन्स) सूर्या शर्मा व वरिष्ठ पत्रकार आणि ब्रह्माकुमारी संस्थचे बी. के. करुणा भाई उपस्थित होते. सी-मेट ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असून, त्याचे महासंचालक डॉ. भारत काळे हे आहेत. “न्यूट्रिनो कणांपासून विद्युत ऊर्जा मिळविणे, ही मानवी इतिहासाला कलाटणी देणारी घटना असेल. या सहकार्य कराराच्या माध्यमातून संशोधन आणि विकासाची कामे केली जाणार असून, त्यातील स्वामित्व हक्क आणि संशोधनाचे हस्तांतरणासंबंधी नियम निश्चित करण्यात आले आहेत,’ असे होलगर थोर्स्टन म्हणाले.
“सी-मेट’मध्ये न्युट्रिनो ऊर्जेवर होणार प्रयोग
या “पाय-कार’साठी जर्मनीच्या ग्रुपने इतकी मोठी गुंतवणूक करण्यासाठी तयारी दाखविणे भारतीय आणि पुणेकरांसाठी आनंदाची बाब आहे. सुपर कॅपॅसिटर बनवणाऱ्या स्पेल टेक्नॉलॉजी हे न्यूट्रिनो एनर्जी डिव्हाईस तयार करणार आहे. प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भाटकर यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प पूर्ततेच्या दिशेने नेला जाणार आहे. या प्रकल्पामुळे इलेक्ट्रॉनिक व्हेईकलच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल होणार असून, भारताला आत्मनिर्भर बनविण्यास हातभार लागणार आहे.
– डॉ. राजेंद्रकुमार शर्मा, स्पेल टेक्नॉलॉजी, पुणे