कोणतेही नॉन अल्कोहोलिक ड्रिंक, ज्यामध्ये कॅफिन, टॉरिन आणि व्हिटॅमिन व बाकी इतर घटक असतात, अशा ड्रिंकला एनर्जी ड्रिंक म्हणतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. त्यामुळे एनर्जी ड्रिंकची सवय किंवा अतिरेक हा आपल्या मेंदूवर आणि शरीरावर दीर्घकाळ परिणाम करू शकतो. नैराश्य येणं, वेड लागणं इतकंच नाही, तर तुमचा स्वत:वरील ताबाही काही वेळा सुटू शकतो. हे कॅफिनच्या अतिसेवनाचे अनेक दुष्परिणाम आहेत.
उच्च रक्तदाब, भीती वाटणं, दरदरून घाम फुटणं, हृदयाचे ठोके वाढणं, अशा समस्या त्यातून उद्भवू शकत असतानाच, कोला किंवा कॅफिनयुक्त इतर पेय-पदार्थापेक्षा एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफिनचं प्रमाण तीनपट अधिक असतं. स्वाभाविकच, ही पेयं झटपट एनर्जी देत असली तरी ती कालांतराने शरीराला हानिकारक ठरू शकतात.
एनर्जी ड्रिंकमुळे शरीरातील कॅफिनचं प्रमाण वाढतं आणि झोप येत नाही. आपल्या मेंदू आणि शरीराला किमान 5 ते 6 तास शांत झोपेची आवश्यकता असते. एनर्जी ड्रिंकमधील कॅफिनमुळे तुम्हाला झोप येत नाही. मग नैराश्य येतं आणि त्याचं रूपांतर पुढे मनोरुग्णामध्ये होतं. काही वेळा नशा किंवा ड्रग्जकडे आकर्षित होतात. अगदी थोडया कालावधीसाठी भरपूर उत्साह, आत्मविश्वास देणाऱ्या या पेयांच्या सेवनाचे विपरीत परिणाम हृदयाच्या चलनवलनावर होतात, असे आढळून आले आहे. थोडया काळासाठी जो मोठा जोम येतो, त्या भरात जी शक्ती/ऊर्जा खर्च पडते, त्यामुळे नंतर प्रचंड थकवा येतो. मोठा उत्साह उसळतो आणि नंतर निराशेच्या गर्तेत ढकलला जातो.
एनर्जी ड्रिंकमधील उत्तेजित पेय हृदयासाठी घातक असतात. मद्यासोबत एनर्जी ड्रिंक प्यायल्यास, हृदयाच्या रक्तपुरवठयावर परिणाम होतो. ऊर्जेच्या ड्रिंकमध्ये कॅफिनची जास्त सामग्री असल्यामुळे, इन्सुलिन संवेदनशीलता कमी होते, ज्यामुळे प्रथिने किंवा मधुमेह वाढतो. एनर्जी ड्रिंकमध्ये सहसा साखर मोठया प्रमाणात असते. साखर सामग्री प्रामुख्याने सुक्रोज, ग्लुकोज किंवा उच्च फ्रूटोज कॉर्न सिरपच्या रूपात असते.
स्पोर्टस ड्रिंक व्हिटॅमिन आणि मिनरल्सने भरलेले असतात; परंतु त्यात मोठया प्रमाणात साखरही असते. लोकप्रिय ब्रॅंडमध्ये एक (300-500 मिली) बाटलीमध्ये आठ चमचे साखर असते. त्यांना चांगली चव देण्यासाठी आवश्यक आहे; परंतु त्याचा आरोग्यावर घातक प्रभाव पडतो. दीर्घ कालावधीत जास्त प्रमाणात साखरेमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वजन वाढणे होऊ शकते. स्पोर्टस ड्रिंकच्या अत्याधिक वापरामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल तक्रारी वाढल्याचे दिसून येते. वारंवार या ड्रिंकचे सेवन न करता कधीतरी हे पिण्यास हरकत नाही. मात्र, याचे व्यसन नक्कीच आरोग्याला घातक ठरू शकते.
ज्या व्यक्ती जास्त व्यायाम करत नाहीत अथवा शारीरिक हालचाली ज्यांच्या कमी प्रमाणात होतात, अशा व्यक्तींनी स्पोर्टस ड्रिंकचे सेवन केले, तर ते वजन वाढीस नक्कीच कारणीभूत ठरू शकते. तसेच यामध्ये असलेल्या साखरेच्या अधिक प्रमाणामुळे दंत समस्यादेखील वाढीस लागू शकतात. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते लहान मुलं आणि किशोयवयीन मुलांनी एनर्जी ड्रिंकचे सेवन करू नये. शारीरिक ऊर्जेसाठी मुलांनी समतोल आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे.
पुरेशी झोप आणि समतोल आहार हे ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत आहेत. जीवनशैलीत अचूक बदल केल्यास प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगता येऊ शकते. ऊर्जा मिळविण्यासाठी एनर्जी ड्रिंकचे सेवन न करता नैसगकरीत्या ऊर्जा मिळविण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे.