मुंबई : फ्रान्समध्ये सध्या सुरु असणाऱ्या धार्मिक अराजकतेच्या मुद्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होताना दिसत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता शिवसेनेने देखील फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
मोहम्मद पैगंबर यांचे कोणतेही चित्र अस्तित्वात नाही. ही श्रद्धा आहे. त्यामुळे असे चित्र काढणे हा मुसलमानांनी गुन्हा ठरवला, पण त्या गुन्ह्यासाठी ‘अल्ला हू अकबर’चे नारे देत लोकांना गळे चिरून मारा, असेही पवित्र कुराणात लिहिलेले नाही किंवा पैगंबर साहेबांनी सांगितलेले नाही. त्यामुळेच फ्रान्समध्ये ज्यांनी धर्माच्या नावावर गळे चिरण्याचा अमानुष, अघोरी प्रकार केला ते मानवतेचे, जगाचेच शत्रू आहेत. मॅक्रॉन यांच्या पाठीशी त्यासाठीच उभे राहणे गरजेचे आहे.
हिंदुस्थानातील राजकीय पक्षांनी व मुस्लिम समुदायाने फ्रान्सच्या अंतर्गत भानगडीत पडण्याचे कारण नाही, असे शिवसेनेने म्हटलं आहे. फ्रान्समध्ये एक ठिणगी पडली आहे व त्याचा वणवा जगभरात पसरताना दिसत आहे. फ्रान्समध्ये जे घडले त्याचा संबंध पुन्हा एकदा पैगंबर मोहम्मदांच्या व्यंगचित्राशी आहे.
प्रेषित मोहम्मदांचे व्यंगचित्र काढल्यामुळे मुस्लिमांच्या भावना भडकल्या. त्या इतक्या की, धर्मांध मुसलमानांनी लोकांचे गळे चिरून हत्या केल्या आहेत व कॅनडापासून फ्रान्सपर्यंत निरपराध लोकांवर चाकूहल्ले सुरू झाले आहेत, असंही शिवसेनेनं नमूद केलं आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून फ्रान्सला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.