पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात

सांडपाण्याने कोंडतोय जलचरांचाही श्‍वास

पिंपरी – पूर्वी पिंपरी-चिंचवड शहराची ओळख निसर्गरम्य परिसर म्हणून होती. शहरात पिंपळ आणि वडाची झाडे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळेच या गावांची नावे पिंपरी व चिंचवड अशी पडली असा इतिहास आहे. परंतु गावाचे शहर आणि शहराचे झालेले औद्योगिकीकरण यामुळे निसर्गाच्या कुशीत विसवणारी गावे आता सिमेंटच्या जंगलात विसवू लागली आहेत.

पक्ष्यांचा किलबिलाटाऐवजी उद्योगनगरीतील कंपन्यांच्या भोंग्यांचे आवाज व कर्णकर्कश हॉर्न ऐकून घाबरून आपण जागे होत आहोत. परंतु पूर्वी शहरात ठिकठिकाणी वनराई होती. त्यामुळे पक्ष्यांच्या किलबिलाट ऐकू येत होता. कावळ्यांची कावकाव, चिमण्यांची चिवचिव अता कानावर येत नाही. शहरातील झाडे कमी झाल्याने पक्ष्यांचा अधिवास कमी झाला आहे. सिमेंटची घरे झाल्याने पक्ष्यांना राहण्यास ठावठिकाणाच राहिला नाही. त्यामुळे शहरातून पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होताना दिसत आहेत.

निगडी प्राधिकरणाच्या आसपास मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनराई होती. त्यामुळे पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर येथे अधिवास होता. म्हणजेच पाणथळीच्या जागा, झाडे झुडपे, गवताची वने, वृक्षसंपदा उपलब्ध होती. त्यामुळे पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात वास येथे होतो. परंतु शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेत झाडांची मानवाने कत्तल करत सिमेंटची जंगले उभी केली. जसे जसे देशात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले तसतसे नागरिकांच्या मूलभूत गरजाही बदलत गेल्या. वाहनांची व उद्योगांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होऊ लागले. परंतु प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षांची गरज असते तेच वृक्ष माणसाने स्वार्थापायी छाटून टाकल्याने आज पक्षी स्थलांतर करत आहेत. अनेकांचा त्यात बळीही गेले असे महत्त्वपूर्ण निरीक्षण प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पक्षी व पर्यावरण विभागाने नोंदविले आहे.

मागील तीन वर्षांपासून समितीचे पक्षीप्रेमी व अभ्यासक दुर्गा टेकडी परिसर व दत्तनगर समर्थनगरी निगडी या परिसरात पक्षीनिरीक्षण करीत आहेत. देहूरोड संरक्षण विभागाच्या जागेतील म्हणजेच निगडी जकात नाक्‍याजवळील दत्तनगर परिसरातील दलदलीचे क्षेत्र हे पक्षीप्रेमींचे आवडते क्षेत्र आहे. समितीचे सदस्य या परिसरात पक्षीनिरीक्षण करीत आहेत. कविता बेंडाळे, ऍड. विद्या शिंदे, विजय मुनोत, संतोष चव्हाण, अमोल कानू यांनी अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे निरीक्षण नोंदवले.

सांडपाण्यामुळे दलदलीचे क्षेत्र प्रदूषित होत आहे. प्रदूषित पाण्यामुळे अनेक कीटक व जलचर मृत्युमुखी पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच केजूबाई बंधाऱ्यात मासे व कासव मृत्युमुखी पडल्याची वार्ता आपण ऐकली. त्यामुळे जलचरांचा जीव धोक्‍यात आला आहे. पक्ष्यांसाठी उपलब्ध होणारी अन्नसाखळी नष्ट होत आहे. त्यामुळे अनेक पक्ष्यांना स्थलांतर करावे लागले तर काहींचा विषारी अन्नामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कमल पक्षी, गाय बगळे, लहान बगळा, पाणकोंबडी, टिटवी, कावळा, चिमणी या पक्ष्यांची घट नोंदली गेली.

प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे पक्ष्यांच्या संख्येत निम्याहून अधिक घट या तीन वर्षांत झाल्याचे पक्षीनिरीक्षकांनी आपले निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षकांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. पक्षीनिरीक्षकांच्या मते, पुढील महिन्यांपासून या पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरू होत आहे. यावर उपाययोजनेसाठी कॅन्टोमेंट अधिकारी आणि पालिका पर्यावरण विभागाचे अधिकारी यांनी त्वरित पावले उचलणे आवश्‍यक आहे. अन्यथा अतिक्रमण आणि प्रदूषण यामुळे थोड्याच काळात ते नष्ट होईल.

निरीक्षण केंद्र आरक्षित करणे गरजेचे
प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील म्हणाले, आपल्या शहरात पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. समितीच्या पक्षीतज्ज्ञांकडे त्याबाबत विचारणाही वाढत आहेत. त्या संदर्भात पालिका प्रशासन योग्य पावले उचलताना दिसून येत नाही. शहरात पक्षी निरीक्षण केंद्रांची स्थापना करणे गरजेचे आहे. शहरात अशी अनेक नैसर्गिक पक्षी ठिकाणे आहेत. त्यांची योग्य नोंद घेऊन त्या ठिकाणी बांधकामाना परवानगी न देता ती ठिकाणे निरीक्षण केंद्रे म्हणून आरक्षित करणे आवश्‍यक आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.