सोक्षमोक्ष: व्यक्‍ती संपवाल पण विचार?

अशोक सुतार

सहा वर्षांपूर्वी आज 20 ऑगस्टला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या व्यक्‍तीची झाली आहे तिच्या विचारांची नाही, हे मात्र मारेकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या मारेकऱ्यांनी पुण्यात केली होती. त्यानंतर विचारवंत गोविंदराव पानसरे यांची हत्या कोल्हापुरात केली गेली. धारवाड येथील प्रा. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. बंगळुरू येथील “लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांची दि. 5 सप्टेंबर 2017 रोजी अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येला पुढील महिन्यात दोन वर्षे पूर्ण होतील. हे सर्व उजव्या विचारसरणीचे कट्टर विरोधक होते. या विचारवंतांच्या हत्येचा तपास अजून लागलेला नाही.

अंधश्रद्धा निर्मूलन करणारे डॉ. दाभोलकर, कट्टर धार्मिकतेला विरोध करणारे पानसरे व गौरी लंकेश, समानतेचा आग्रह व कट्टरवादाला विरोध करणारे कलबुर्गी यांनी समाजाला एक दिशा दिली. त्यांच्या विचारांचे अनुयायी वाढत आहेत. त्यामुळे आपल्या पारंपरिक, कट्टर विचारांना धोका जाणवत असल्याची जाणीव कट्टरपंथीयांना झाली होती, हे या विचारवंतांच्या हत्यांवरून समजून येते. एक प्रकारचा धार्मिक कट्टरवाद जोपासून लोकांमध्ये धार्मिक दहशत बसविणाऱ्यांचे या विचारवंतांमुळे धाबे दणाणले होते. परंतु व्यक्‍ती मारून विचार मरत नाहीत, ते सर्वदूर पसरतात, हे मारेकऱ्यांच्या डोक्‍यात कधी येणार? व्यक्‍ती संपवाल पण विचारांचे काय?

डाव्या विचारवंतांच्या हत्या सुनियोजित आहेत, असे दिसते. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांनी समुद्रात टाकलेली हत्यारे शोधण्यासाठी आता अद्ययावत यंत्रणेचा वापर आणि प्रतिष्ठित संस्थेचे सहाय घेणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी ऐकण्यात आली. तपास लवकर सुरू झाला असता तर आज आरोपी कायद्याच्या पिंजऱ्यात असते. पुण्यात तर एका अधिकाऱ्याने तंत्र-मंत्र विद्येतून तपासाची दिशा शोधण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात, त्या प्रकारावर सर्व थरांतून टीका झाली.

अंधश्रद्धा निर्मूलनाचा तपास करण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार घेणे म्हणजे अधिकाऱ्याचे अज्ञान किती आहे, हे दिसले. काही तथाकथित धर्मरक्षक व समाजात बदलाची अपेक्षा करणारे यांच्यात यामुळे सोशल मीडियावर वाद सुरू असतो. दोन वर्षांपूर्वी गौरी लंकेश यांच्या हत्येच्या दिवशीच गुजरात येथील सुरतच्या निखिल दधिच या ट्‌विटर युजरने दि. 5 सप्टेंबर 2017 रोजी एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. हे आक्षेपार्ह ट्‌विट केल्यामुळे नेटीझन्स संतप्त झाले होते. नंतर त्या ट्‌विटर युजरने, मी गौरी लंकेश यांना उद्देशून ही पोस्ट केली नव्हती, अशी सारवासारव केली होती.

आज देशात झुंडशाही वाढली आहे, या झुंडशाहीतील अनेक जण लोकशाहीप्रमाणे राहात असल्याचा देखावा करत असले तरी त्यांचे मन, मेंदूतील ठोकशाही व रानटी विचार जाणार नाहीत, हीच बाब खरी आहे; परंतु देशात डाव्या विचारसरणीचे लोक शिल्लकच ठेवायचे नाहीत, अशा प्रकारचा छुपा संघटित दहशतवाद फोफावत आहे, हे नक्‍की! अंधश्रद्धेला विरोध करणारे नरेंद्र दाभोलकर, डावे विचारवंत गोविंदराव पानसरे, धारवाडचे विचारवंत कलबुर्गी यांची हत्या केल्यानंतर ते आता उरलेल्या विचारवंतांना संपवायला निघालेत. परंतु, आपले विचार व शक्‍ती गहाण ठेवणाऱ्यांनो, व्यक्‍तीला मारून विचार मरत नाहीत तर ते विचार अधिक प्रज्वलित होतात आणि जगाला सत्याची शिकवण देतात, हे लक्षात ठेवा.

गौरी लंकेश या परखड, डाव्या विचारवंत, पत्रकार होत्या. त्या उदारमतवादी दृष्टिकोनाच्या होत्या. त्यांनी विशेषतः कट्टर प्रवृत्तींविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. डॉ. दाभोलकर यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, जुन्या रूढी, परंपरा यांच्याविरोधात आवाज उठवला होता. कलबुर्गी यांनी प्रस्थापित धर्मसत्तेला आव्हान दिले होते. पानसरे यांनी तर ढोंगी धर्मवादाची चिरफाड केली होती. रूढ मतांविरोधात परखड व सत्य मांडणाऱ्या विचारवंतांची मात्र हत्या करण्यात आली. परंतु विचारवंतांना मारून अंधरुढींविरोधातील प्रबोधन चळवळ संपणे शक्‍य नाही. ती यापुढे अधिक जोमाने सुरू राहील. झुंडशाहीच्या बळावर तुम्ही काही व्यक्‍ती संपवू शकता; परंतु चळवळ संपवू शकत नाही.

सोशल मीडियावर अनेक टिकोजीराव परखड भूमिका मांडणाऱ्यांवर शाब्दिक हल्ले करण्यात पटाईत आहेत. प्रसंगी भारतीय संविधानावर हे टिकोजीराव टीका करतात. अशांवर सरकारने कारवाई करण्याची गरज आहे. ही एक प्रकारची झुंडशाही सोशल मीडियावर नव्याने निर्माण झाली आहे. ही परिस्थिती सामाजिक सलोखा राखण्यासाठी व सर्वधर्मसमभाव राखण्यासाठी धोकादायक आहे. देशात बऱ्याच गोष्टी लोकशाहीविरोधी, असंविधानिक पद्धतीने सुरू आहेत. ही परिस्थिती सरकारने बदलावी व लोकशाहीप्रणीत सरकार सत्तेत आहे, असा विश्‍वास जनतेला दाखवून देण्याची गरज वाटत आहे.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांची हत्या ही समाजातील नीतिमत्ता, विज्ञानवादी, वैचारिक चळवळ संपविण्यासाठीच होणारे प्रयत्न पाहिल्यानंतर पुणे ते बेंगळुरू ही सुरू झालेली हत्याकांडांची मालिका शमणार की नाही? असा प्रश्‍न पडतो. दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने एका प्रकरणात सुनावले होते की, समाजसेवकांच्या हत्या म्हणजे एक संघटित झुंडशाही आहे. याला मोठ्या प्रमाणात संघटित पाठबळ असल्याशिवाय मारेकरी मोकाट राहणार नाहीत. केंद्र सरकार व देशातील गुन्हे तपास यंत्रणेने हे संघटित गुन्हेगार शोधावेत हीच अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.