ग्रीन रिफायनरीचा विरोध सामंजस्याने संपवा; राज ठाकरे यांची मागणी

मुंबई  – रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला होणाऱ्या विरोध तज्ज्ञांकडून समजाऊन संपवावा आणि बुध्दीमान कोकणी माणसाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायला हवी. त्याचे बरोबर कोकणसाठी समग्र पर्यटन धोरण आखण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र उडणवीस यांच्याकडे अनावृत्त पत्राद्वारे केली आहे. कोणी काही म्हटले तरी महाराष्ट्र फर्स्ट, असेच धोरण असायला हवे, असा आग्रह त्यांनी धरला आहे.

कोकणावर निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण आहे. तिन्ही ऋतूत कोकण सुंदर दिसते. आणि म्हणूनच पर्यटन हा कोकणाचा आणि पर्यायाने माझ्या कोकणी माणसाच्या जगण्याचा श्वास होऊ शकते. कोकणाला विकासाच्या कुठल्याच मॉडेलची गरज नाही. अर्थात, या दृष्टीने एक समग्र विचार व्हायला हवा, असे सांगून ठाकरे म्हणतात, या भूमीने सात भारतरत्न देशाला दिली. पण तरीही कोकणी तरुण विषण्ण आहे. त्याला नोकरीसाठी, रोजगारासाठी मुंबई-पुण्याची वाट धरावी लागते. खरं तर पर्यटन कोकणाचं भवितव्य बदलू शकतं, पण तो विचार नीट झाला नाही, आसपासची राज्यं महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत. अशा वेळेस महाराष्ट्राने रत्नागिरी राजापूर रिफायनरीसारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये.

या प्रकल्पाला काही स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध होता. त्यांचे म्हणणे रास्त होते. इथल्या जमिनी परप्रांतियांच्या घशात जाऊ शकतात नवीन प्रकल्पामुळे निर्माण होणारा रोजगार आणि इतर उद्योग यात कोकणी माणसाला स्थान कुठे असेल ही त्यांची शंका होती. काही पर्यावरणवाद्यांच्या मनातील ही भावना होती की कोकणाचा निसर्ग नष्ट होईल. तिथे असलेल्या काही मंदिरांचाही प्रश्न होता. या मंदिरांचं काय होणार हा विचार त्यांच्या मनाला नख लावत होता. हे प्रश्न, चिंता, शंका रास्त होत्या आणि आहेत. पण आज यावर मार्ग काढणं आवश्‍यक आहे, असे ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

आज एकही नवा उद्योग अथवा एकही परदेशी गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणं आपल्याला परवडण्यासारखं नाही. अन्यथा औद्योगिकरणात अग्रेसर महाराष्ट्र ही ओळख पुसाली जाईल. या नवीन प्रकल्पामुळे जो रोजगार निर्माण होईल त्यात कोकणी माणसाला आणि पर्यायाने महाराष्ट्रातील मराठी माणसांनाच प्राधान्य असायला हवे असा करार सरकारने गुंतवणूकदार कंपनीसोबत करायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.

कोकणातील तरुण-तरुणींनी पुढाकार घ्यायला हवा. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, क्षमता आहे, त्यामुळे या संधीचं सोनं माझे कोकणातील बांधव-भगिनी करतील याबाबतीत माझ्या मनात तरी शंका नाही. आणि जर त्यांच्या कोणी आड आलं तर त्या लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संघर्षाची तयारी ठेवावी. राज्य सरकारने आता सामंजस्याची भूमिका घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने स्थानिकांच मत बदलवावं. हे करताना संघर्षाची भूमिका अजिबात घेऊ नये. त्याचबरोबर तातडीने कोकणाच्या पर्यटनासाठी एक समग्र धोरण ठरवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे त्यांनी नमूद केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.