बिबवेवाडी (हर्षद कटारिया)-मार्केट यार्ड येथे शिवनेरी रस्त्यालगतच्या पदपथावर फिरस्त्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी त्यांनी वसाहतच उभी केली होती. ताडपत्रीची घरे बांधून तेथेच हार-फुले तसेच खेळणी विक्रीची दुकाने थाटली होती. याबाबत तक्रारी आल्याने आमदार माधुरी मिसाळ यांनी बैठक घेत सदर अतिक्रमण तातडीने उठविण्याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार आज कारवाई करण्यात आली.
मार्केट यार्ड येथे भाजी मंडई समोर पदपथावर फिरस्ते विक्रेत्यांनी रहिवासी अतिक्रमण करीत पदपथाचा ताबा घेतला होता. पदपथावरच ताडपत्रीचे घर बांधून रस्त्यालगत दुकाने थाटण्यात आली होती. यातून वाहतूक कोंडीसह स्थानिक नागरिकांनाही त्रास होत होता, याबाबत नागरिकांचे प्रश्न तसेच प्रशासनाची भूमिका याबाबत “प्रभात’ने सातत्याने वृत्त दिले. याची दखल घेत आमदार माधुरी मिसाळ यांनी पोलीस, कृषी उत्पन्न बाजार समिती, पालिका अधिकारी यांची एकत्रित बैठक घेत या बेकायदेशीर अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी (दि.15) प्रशासनाकडून कारवाई करीत पदपथावरील अतिक्रमणे काढण्यात आली.
पदपथावर राहण्यासाठी “भाडे’?
सकाळी पोलीस तसेच पालिका प्रशासनाकडून कारवाई करीत येथील पदपथावरील अतिक्रण काढण्यात आली. नागरिकांना पदपथ चालण्यास खुले केले. मात्र, संध्याकाळी येथे पुन्हा फिरस्ता विक्रेत्यांनी पदपथावर ताबा टाकला. विशेष म्हणजे पोलीस व पालिका अतिक्रमण विभागाने केवळ बघ्याची भूमिका घेतली.फुटपाथवर राहण्यासाठी तसेच व्यावसाय करण्यासाठी काही जण “भाडे’ घेत असल्यानेच नरमाइची कारवाई होत असल्याची चर्चा असल्याने या प्रकारणामागील गौडबंगाल वाढले आहे.