अतिक्रमणे, अतिवृष्टीमुळेच महापुराचा फटका

कोल्हापूर आणि सांगली येथील परिस्थितीवर वडनेरे समितीचा अहवाल


अलमट्टी धरण कारणीभूत नसल्याचे स्पष्टीकरण

पुणे – मागील वर्षी कोल्हापूर आणि सांगली आलेला महापूर हा अलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे आला नसून, शंभर वर्षांतील सर्वाधिक पाऊस, नदीकाठची अतिक्रमणे, नदीपात्राचे आकुंचन, ओढे आणि नाल्यांचा बुजलेला प्रवाह यामुळे या भागाला महापुराचा फटका बसला, अशी माहिती भीमा-कृष्णा खोरे अभ्यास समितीचे अध्यक्ष सेवा निवृत्त जलसंपदा सचिव नंदकुमार वडनेरे यांनी शुक्रवारी दिली.

कोल्हापूर आणि सांगली येथील पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीने दि.27 मे रोजी राज्य सरकारला अहवाल सादर केला. समितीचे सदस्य सचिव आणि जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, विनय कुलकर्णी, संजय घाणेकर, भारतीय उष्णदेशीय हवामान विभागाच्या संशोधक आणि समिती सदस्य नयना देशपांडे आदी यावेळी उपस्थित होत्या.

समितीने म्हटल्यानुसार, “कर्नाटकमधे अलमट्टी आणि हिप्परगी धरणे महाराष्ट्राच्या लगत आहे. मात्र, या धरणाचा फुगवटा महाराष्ट्र सीमेपासून 22 किलोमीटर दूर अंतरापर्यंत आहे. त्यामुळे अलमट्टीमुळे राज्यात पूर येण्याची शक्‍यता नाही. कृष्णा नदीला ब्रह्मनाळ ते राजापूरदरम्यान येरळा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा नद्या मिळतात. या नद्यांमधील जोरदार प्रवाहामुळे कृष्णेच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. परिणामी, नदीचा प्रवाह पात्र सोडून बाहेर जातो. त्यातच अतिक्रमण, गाळ या मुळे नदीचे पात्र उथळ होऊन वहन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे पुराची तीव्रता वाढली.’

महत्त्वाच्या शिफारसी
– पूरप्रवण क्षेत्र कायदा (फ्लड झोन ऍक्‍ट) लागू करावा.
– नदी, नाल्यांच्या काठावरील अतिक्रमणांबाबत धोरण आखावे.
– प्रतिबंधित क्षेत्रांतील अतिक्रमणे हटविण्यासाठी
– सांगली-कोल्हापूरला प्राधान्य द्यावे.
– पूररेषा सुधारित करणे, पूर धोका पूर्वानुमान पद्धतीचा वापर करणे
– अलमट्टी-कृष्णेतील विसर्गामधे कर्नाटक-महाराष्ट्रात समन्वय असणे आवश्‍यक.
– राधानगरी धरणातील स्वयंचलित दरवाजे बदलून मानव नियंत्रित दरवाजे बसवावेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.