Pimpri News : कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाईला हिंसक वळण; पोलिसांवर दगडफेक
Pimpri News : पोलीस वाहनाचीही तोडफोड; दोघे ताब्यात

Pimpri News : कुदळवाडी परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण निष्कासन कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असून शासकीय वाहनाचेही नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांना ताब्यात घेतले असून ३०० ते ५०० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नाजीम नईम चौधरी (वय २६, रा. ऐश्वर्यम हमारा, जाधववाडी, चिखली), इजाज वकार चौधरी (वय २६, रा. अक्सा एम्पायर, मोशी रोड, चिखली) यांच्यासह ३०० ते ५०० अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अमोल नानासाहेब फडतरे यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ९ जून) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पथक कुदळवाडी परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कारवाई करत होते. Pimpri News
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक राम गोविंदराव गोमारे, एसआरपीएफ जवान आणि दंगल नियंत्रण पथकाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, कुदळवाडी पुलाजवळील किंग वजन काटा परिसरात आणि नायरा पेट्रोल पंपासमोर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. जमावाने कारवाईला विरोध करत रस्ता अडविला. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही जमावाने घटनास्थळ सोडले नाही. त्यानंतर जमावातील काही जणांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. Pimpri News
पोलीस कर्मचारी जखमी
या दगडफेकीत दंगल नियंत्रण पथकाच्या एमएच-१२-व्हीसी-८१४८ या शासकीय वाहनाच्या समोरील काचा व आरसे फुटले. वाहनाचे नुकसान झाले. सहायक पोलीस निरीक्षक राम गोविंदराव गोमारे यांच्यासह काही पोलीस कर्मचारी जखमी झाले.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी किमान बळाचा वापर केला. त्यानंतर जमाव घटनास्थळावरून पांगला. पोलिसांनी पाठलाग करून नाजीम चौधरी आणि इजाज चौधरी या दोघांना ताब्यात घेतले. घटनेनंतर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतर महापालिकेची अतिक्रमण निष्कासन कारवाई शांततेत पूर्ण करण्यात आली.
हेही वाचा:






