कराड – प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजलखानाच्या कबरी शेजारील अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवावे व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करावी अशा सुचना महामहिम राज्यपाल यांनी महाराष्ट्र शासनाला कराव्यात अन्यथा हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्रभर आंदोलन करेल असा इशारा हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली राजभवन महाबळेश्वर येथे भेट घेऊन याबाबतचे निवेदन हिंदू एकता आंदोलन यांच्यावतीने देण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे. महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या अफजल खान रुपी राक्षसाचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी कोथळा काढला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भिमरुपी भीम पराक्रमाची नोंद देशाच्या इतिहासात नोंदली गेली. दुर्दैवाने आज त्याच प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलखानाच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न काही धर्मांधांकडून केला जात आहे.