कोंढवा –कात्रज बायपास रस्त्यावरील उंड्रीपासून उगम पावलेला ओढा अमित कलरी, होलेवस्ती, कडनगर चौक मार्गे महंमदवाडी असा 33 फूट रुंद आणि साडेतीन किमी लांबीचा आहे. या ओढ्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. होलेवस्ती येथील ओढ्यात सिमेंटचे पाइप टाकून त्यावर बांधकाम केल्याने पावसाचे पाणी गेल्या वर्षी क्रोम सोसायटी आणि नाल्यालगत असलेल्या नागिरकांच्या घरामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले होते.
या परिसरातील नागरिक अल्लाबक्ष शेख, अविनाश टकले, राजेंद्र भिंताडे यांनी याबाबत सांगितले की, तब्बल 33 फूट रुंदीच्या ओढ्यावर बांधकाम करून पाणी जाण्यासाठी केवळ दोन-तीन फुटी सिमेंट पाइप टाकल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. येत्या पावसाळ्यामध्ये ओढ्यालगतच्या सोसायट्या आणि बैठ्या घरामध्ये पाणी शिरणार ही वस्तुस्थिती आहे.
याबाबत हनुमंत घुले, दादा कड, कैलास पुणेकर, अक्षय फुलावरे, ओंकार होले, कपिल आबनावे यांनीही पालिकेच्या दुर्लक्षीत भूकिमेवर संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, उंड्री-महंमदवाडीतून वाहणाऱ्या इंग्रजी शाळेजवळील ओढ्याचा प्रवाह बदलून बंदिस्त केला जात आहे. डीपी रस्त्याची जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यातून रस्तारुंदीकरणाला मोठा अडथळा होणार आहे. येत्या पावसाळ्यात येथे पूरस्थिती झाली, तर अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही स्थिती ओढवली असल्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याचा इशारा येथील नागरिक राजेंद्र भिंताडे यांनी दिला आहे.
होलेवस्ती, कडनगर चौक तसेच उंड्री, महमंदवाडी परिसरात पावसाळ्यामध्ये पूरस्थिती येऊ नये म्हणून ओढा रुंदीकरणासाठी परवानगी दिली आहे. – अनूप गुज्जलवार, महापालिका अधिकारी