हडपसर येथे पालिकेच्या जागेत अतिक्रमणे

बेकायदेशीरपणे जागाविक्री करणारी टोळी कार्यरत असल्याची तक्रार

पुणे – हडपसर येथील सर्व्हे नं. 45, 57, 59 आणि 72 येथील महापालिकेच्या मालकीच्या मिळकतींवर अनधिकृत आणि बेकायदेशीर प्लॉटिंग, बांधकामे, दुकाने बांधण्यात आली असून, त्याची बेकायदेशीरपणे विक्री केली जात असल्याची तक्रार नगरसेवक अशोक कांबळे आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक फारूक इनामदार यांनी केली आहे.

 

सर्व्हे नं. 45 मध्ये नालागार्डन आणि ऍमिनिटी स्पेससाठी सोडलेली जागा आहे. तेथे त्या भागातील काही लोकांनी अतिक्रमण केले असून येथे बेकायदेशीर गॅरेज आणि दुकाने उभारली आहेत. शिवाय ही मिळकत स्वत:ची आहे असे भासवून लोकांना भाडेतत्त्वावरही दिली आहे, अशी या दोघांची तक्रार आहे.

 

सर्व्हे नं. 59 मध्ये तर महापालिकेची जागा बनावट कागदपत्रांद्वारे विक्री करण्यात येत आहे. सर्व्हे नं. 57 मधील जागा ही राज्य समाजकल्याण विभागाची आहे. तेथे शाळा, गार्डन, दफनभूमी, हॉस्पिटल, कचरा प्रक्रिया केंद्र, स्लॉटर हाऊस असे आरक्षण आहे. पण, येथे या लॅंड माफियांनी दुकाने उभारल्याची तक्रार कांबळे यांनी केली आहे.

 

चौकशीचे आदेश

या विषयावर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतच चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या जागेवर अशाप्रकारे अतिक्रमण केले जात असल्याची तक्रार यावेळी संबंधित नगरसेवकांनी केली. त्यावर या विषयाची सखोल चौकशी करून माहिती द्या, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी महापालिका प्रशासनाला दिले. या विषयाची माहिती घेऊन, नक्की परिस्थिती काय आहे, हे पहावे लागेल. त्यासाठी तातडीने कनिष्ठ अभियंत्यांना माहिती घेण्याच्या सूचना दिल्याचे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.