पदपथावर व्यावसायिकांचे अतिक्रमण

पिंपरी – शहरातील मुख्य रस्त्यालगतच्या पदपथांसह विविध भागांतील पदपथांवर छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना पदपथांवर चालणे दुरापास्त झाले असून, रस्त्यांच्या मधून वाट काढावी लागत आहे.

मुख्य रस्त्यालगतच्या पदपथांवर हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते, हातगाडीधारक तसेच पथारी व्यावसायिकांनी गेले अनेक दिवसांपासून ठाण मांडले आहे. चिंचवड, भोसरी, पिंपरीसह निगडी प्राधिकरणातील तसेच शहरातील विविध भागांत पदपथ गिळंकृत केल्याने नागरिकांना वर्दळीच्या रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत आहे. चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर परिसराला अतिक्रमणाचा विळखा पडला असून मंदिर परिसरातही विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. याबाबत कारवाई करूनही येथील परिस्थिती जैसे-थेच आहे.

महापालिका प्रशासनाकडून या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही या अतिक्रमणधारकांना पाठीशी घातले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर एका बाजूला दुचाकी वाहनांची पार्किंग केली जाते. तर दुसरी बाजू ही खाद्यपदार्थ विक्रेते. टायर पंक्‍चरच्या दुकानानी व फळविक्रेत्यांनी व्यापली आहे. काही इमारतींच्या प्रवेशद्वारालगत तसेच शाळांच्या परिसरातील पदपथांवर अतिक्रमण केल्याने स्थानिक रहिवाशांना तसेच पालकांना ये-जा करताना अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेतही हिच स्थिती आहे. या पदपथांवर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी पदपथ उपलब्ध नसल्याने महापालिका प्रशासनाने दुकानदारांवर कारवाई करून अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत. शहरातील पदपथांवरील अतिक्रमण त्वरित हटवून पदपथ नागरिकांना चालण्यासाठी खुले करून द्यावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.

अतिक्रमण विभागाची कारवाई नावापुरतीच
अतिक्रमण विभागाची कारवाई ही नावापुरतीच असल्याने दुकानदारांना कारवाईचा धाक उरला नाही. त्यामुळे दुकानदार सर्रास पदपथांवर साहित्य मांडत आहेत. कारवाईची माहिती आदीच मिळत असल्याने त्या दिवशी पदपथ रिकामे असतात. परत परिस्थिती जैसे थे असते. त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथक आणि व्यावसायिक यांच्या काही तरी लागेबांधे असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.