एकतानगर येथील प्रकार : पर्यावरणप्रेमींनी केली प्रशासनाकडे तक्रार
औंध – सुसरोड परिसरातील एकतानगर येथील रिवर रेन सोसायटी मागे रामनदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात भराव आणि राडारोडा टाकण्यात आला. या प्रकाराबाबत पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांना ओढा व नदीवरील झालेल्या अतिक्रमणांची चूक दाखवून दिली असली तरीही अद्यापही नदी ओढ्यावरील अतिक्रमणे सुरू आहेत. सुसरोड परिसरातील एकतानगर भागातील रिवर रेन सोसायटीमागे राम नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आल्याचे पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तक्रार केली आहे.
पाषाण परिसरातील राम नदीवर या आधीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे; परंतु पुण्यात नदी व ओढ्यावरील पुराची घटना ताजी असताना भराव टाकून मैदान तयार करण्याचे काम सुरू आहे. ही बाब खूप निंदनीय असल्याचे पर्यावरणप्रेमींनी म्हटले आहे.
काम थांबविले
याबाबत पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी प्रशासनाला कळविले असता सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांनी महापालिकेचे कर्मचारी पाठवून तेथील काम त्वरित थांबवले तेथे असलेले जेसीबी व ट्रक ताब्यात घेण्यास सांगितले. पुढील कारवाई बांधकाम विभागाने दिलेली कागदपत्रे पाहून केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
नदी, नाले, ओढ्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे बुधवार दि. 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे शहरासह उपनगरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आणि त्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. त्यामुळे नदीपात्रावर अशाप्रकारचे अतिक्रमण होणार असेल तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.
– रवींद्र सिंह, पर्यावरणप्रेमी