वानवडी –वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाल असलेल्या इमारतीच्या आवरातच अनेक वेळा अतिक्रमण कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य अस्ताव्यस्त टाकण्यात येते. सध्या शहर तसेच उपनगरांत जोरदार अतिक्रमण कारवाई सुरू आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य बहुतांशी वेळा जागा दिसेल तेथे टाकण्यात येते. संबंधीत दुकानदार, व्यक्ती न्यायालयाकडून जोपर्यंत हे साहित्य सोडवून घेत नाही तोपर्यंत असे साहित्य जागेवरच पडून राहत आहे.
वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयामार्फत अतिक्रमण विभागाकडून वानवडी, रामटेकडी, कोंढवा, जांभुळकर चौक, फातिमा नगर चौक या परिसरात कारवाई करण्यात येते. कारवाईत जप्त करण्यात आलेल्या हातगाडी, फलक, कॅरेट्स आदी साहित्य कार्यालयाच्या इमारतीच्या परिसरात अस्ताव्यस्त टाकले जातात. या इमारतीच्या तळमजल्यावर जप्त केलेले साहित्य आता पार्किंगमध्ये ठेवण्याची वेळ अतिक्रमण विभागावर आली असून, ही जागासुद्धा अपूरी पडत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात चक्क जप्त केलेल्या साहित्याचे ढीग लागले आहेत. याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता कोणतेही उत्तर मिळाले नाही. क्षेत्रीय कार्यालय अधिकारी “नॉट रिचेबल’ होते.